महागडा ‘आयफोन’ घेण्यासाठी पठ्ठ्याने थेट देवाच्या दानपेटीवरच घातला दरोडा! तोफखाना पोलिसांच्या जाळ्यात कसा अडकला? वाचा थरार…
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-आजकालच्या तरुणाईमध्ये महागड्या स्मार्टफोनची, विशेषतः ‘आयफोन’ची (iPhone) क्रेझ कमालीची वाढली आहे.हाच आयफोन मिळवण्याच्या वेडापायी एका २५ वर्षीय तरुणाने चक्क मंदिराची दानपेटी फोडल्याचा धक्कादायक प्रकार अहिल्यानगरमध्ये समोर आला आहे.मात्र,पोलिसांच्या ‘थर्ड आय’ आणि तत्परतेमुळे या चोराचा हा ‘आयफोन’चा शौक फार काळ टिकू शकला नाही. तोफखाना पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास करत या आरोपीला जेरबंद केले असून, त्याच्याकडून चोरीच्या पैशातून खरेदी केलेला आयफोन जप्त केला आहे.मिळालेल्या माहितीनुसार,फिर्यादी सुशील रामलाल बजाज (वय ४५ वर्षे, रा.समतानगर,अहिल्यानगर) यांचा खाजगी व्यवसाय आहे. दि.५ जून २०२६ रोजी रात्री ११:०० वाजेच्या सुमारास त्यांनी मिरजगाव मळा येथील कृपाल आश्रमातील लाकडी दानपेटीमध्ये भाविकांनी दिलेली १७,३०० रुपयांची रोकड मोजून ठेवली होती. त्यानंतर दानपेटीला व्यवस्थित कुलूप लावून त्यांनी आश्रमाचे मुख्य गेट बंद केले होते.
दुसऱ्या दिवशी,म्हणजेच दि.६ जून २०२६ रोजी सकाळी ५:०० वाजता फिर्यादी बजाज हे नेहमीप्रमाणे आश्रमात आले असता,त्यांना मुख्य गेटचे कुलूप आणि कवाडा तुटलेल्या अवस्थेत दिसले.त्यांनी तातडीने आत जाऊन पाहिले असता,लाकडी दानपेटीचे कुलूपही तुटलेले होते आणि त्यातील १७,३०० रुपयांची रोकड गायब झाली होती.
याप्रकरणी त्यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा रजि. नं. ४६७/२०२६, बी.एन.एस. कलम ३०५ (ब), ३३१ (४) प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर आणि पोलीस अंमलदारांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली.घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज बारकाईने तपासण्यात आले.या फुटेजच्या आणि खबऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी संशयास्पद हालचाली करणाऱ्या विजय सुनील यालल (वय २५ वर्षे, रा.श्रीराम चौक,पाईपलाईन रोड,अहिल्यानगर) या तरुणाला ताब्यात घेतले.संशयित आरोपी विजय यालल याला ताब्यात घेऊन जेव्हा पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली,तेव्हा त्याने दिलेली कबुली ऐकून पोलीसही अवाक झाले. आपल्याला एक महागडा ‘आयफोन’ घ्यायचा होता आणि त्यासाठी पैसे कमी पडत असल्याने आपण आश्रमाची दानपेटी फोडल्याची कबुली त्याने दिली.आरोपीने दानपेटीतून चोरलेल्या १७,३०० रुपयांच्या रोकडमधून लगेचच एक सेकंड हँड ‘आयफोन १६’ (आकाशी रंगाचा,आयएमईआय क्र. ३५०३४३६८८३८१६६४) खरेदी केला होता.पोलिसांनी गुन्ह्याच्या तपासादरम्यान हा आयफोन जप्त केला आहे.
ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक श्री.मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक श्री. वैभव कलुबर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.दिलीप टिपरसे नगर शहर विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य,गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर, पो.हे.कॉ.अरुण गांगुर्डे,भानुदास खेडकर,अब्दुलकादर इनामदार,सुधीर खाडे,सुरज वाबळे,पो.कॉ.सुमित गवळी, अविनाश बर्डे,सतिष त्रिभुवन, सुजय हिवाळे,सतिष शिंदे, बाळासाहेब भापसे,कपिल गायकवाड,भागवत बांगर, शाकीर सय्यद,आणि म.पो.ना जिजा खुडे यांनी सहभाग घेतला.तसेच तांत्रिक तपासात दक्षिण मोबाईल सेलचे पो.कॉ. राहुल गुंडू, नितीन शिंदे आणि अरुण सांगळे यांनी मोलाची मदत केली.या गुन्ह्याचा पुढील तपास महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल (म.पो.हे.कॉ) १५० अनिता मरभळ या करत आहेत.
