बापरे..!दागिने पॉलिशच्या बहाण्याने घरात घुसणाऱ्या ‘त्या’ भामट्याला चिंचोली गुरवच्या गावकऱ्यांनी घेरलं..झडती घेताच समोर आलं काळजाचा ठोका चुकवणारं सत्य..!
संगमनेर/राजेंद्र मेढे (प्रतिनिधी):-संगमनेर तालुक्यातून या घडीची एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे.तुमचे सोन्या-चांदीचे दागिने काही मिनिटांत नव्यासारखे चमकावून देतो,” असं म्हणत गावागावांत फिरणाऱ्या एका अट्टल भामट्याला रंगेहात पकडण्यात ग्रामस्थांना यश आलं आहे. चिंचोली गुरव येथे ही थरारक घटना घडली असून, ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे एका मोठ्या गुन्हेगारी टोळीचा पर्दाफाश झाला आहे.मात्र,या कारवाई दरम्यान एक आरोपी पोलिसांना चकवा देऊन फरार झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार,चिंचोली गुरव गावामध्ये दोन परप्रांतीय तरुण संशयास्पदरीत्या फिरत होते. त्यांच्या हातात पॉलिशचे साहित्य होते आणि ते महिलांना दागिने स्वच्छ करून देण्याचे आमिष दाखवत होते. मात्र,चिंचोली गुरव गावातील काही जागृत नागरिकांची तीक्ष्ण नजर या तरुणांवर पडली.
त्यांची बोलण्याची भाषा आणि हालचाली संशयास्पद वाटल्याने ग्रामस्थांनी कोणताही वेळ न दवडता या दोघांना जागीच घेरले आणि थेट ग्रामपंचायत कार्यालयात आणले.ग्रामपंचायत कार्यालयात आणल्यानंतर जेव्हा उपस्थित ग्रामस्थांनी या दोन्ही तरुणांची कसून झडती घेतली,तेव्हा सगळ्यांचेच डोळे पांढरे झाले. त्यांच्याकडे सोन्या-चांदीचे दागिने विरघळवणारे आणि लंपास करण्यासाठी लागणारे अत्यंत घातक रासायनिक पदार्थ (केमिकल्स) आणि इतर संशयास्पद साहित्य आढळून आले.हे तरुण केवळ पॉलिश करणारे नसून लोकांची फसवणूक करणारी मोठी टोळी असल्याचा संशय तात्काळ बळावला.या धक्कादायक प्रकाराची माहिती मिळताच चिंचोली गुरवच्या ग्रामस्थांनी तातडीने संगमनेर तालुका पोलीस स्टेशनशी संपर्क साधला.घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता थेट गावात धाव घेतली.पोलिसांच्या येण्यापूर्वीच ग्रामस्थांनी एका संशयिताला पकडून ठेवले होते,त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.गर्दीचा आणि गोंधळाचा फायदा घेत दुसरा भामटा पोलिसांना चकवा देऊन पळून जाण्यात यशस्वी ठरला.पोलीस सध्या त्याचा जंगजंग पछाडून शोध घेत आहेत.
या घटनेनंतर चिंचोली गुरव ग्रामपंचायत आणि संगमनेर तालुका पोलिसांनी नागरिकांना अत्यंत महत्त्वाचा इशारा दिला आहे.अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नका: ग्रामीण किंवा शहरी भागातील नागरिकांनी कोणत्याही अनोळखी सेल्समन,कंपनीचे प्रतिनिधी किंवा पॉलिश करणाऱ्या व्यक्तीला घरात प्रवेश देऊ नये.कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. परिसरात अशी कोणतीही संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ स्थानिक पोलिसांशी संपर्क साधा.
