कळंबमध्ये बोगस बियाण्यांचा सुळसुळाट..!बोगस सोयाबीन बियाण्यांमुळे शेतकरी संकटात; तात्काळ आर्थिक मदत जाहीर करा,अन्यथा तीव्र आंदोलन संभाजी ब्रिगेड
कळंब (प्रतिनिधी,बिलाल कुरेशी):-कळंब तालुक्यात बोगस आणि निकृष्ट दर्जाच्या सोयाबीन बियाण्यांमुळे हजारो शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे गंभीर संकट ओढवले आहे. पेरणी करूनही शेतात बी उगवलेच नसल्याने बळीराजा हवालदील झाला असून, बाधित शेतकऱ्यांना शासनाने तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी आणि दोषी कंपन्यांवर कठोर कारवाई करावी, अशी आक्रमक मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भातील मागण्यांचे एक सविस्तर निवेदन कळंबचे तहसीलदार हेमंत ढोकले यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.यावर्षी कळंब तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने आणि पदरचे पैसे खर्च करून सोयाबीनची पेरणी केली होती. मात्र, बाजारात उपलब्ध झालेल्या बोगस व अत्यंत निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांमुळे अनेक शेतांमध्ये अंकुरणच झाले नाही. हजारो एकरांवरील पीक वाया गेल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आधीच अनियमित आणि अपुऱ्या पावसामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असताना, आता या बोगस बियाण्यांमुळे त्यांच्यावर दुबार पेरणीची कुऱ्हाड कोसळली आहे. पुन्हा बियाणे, खते आणि मशागतीसाठी पैसा आणायचा कुठून? अशा विवंचनेत सध्या तालुक्यातील शेतकरी सापडला आहे.
शेतकऱ्यांची झालेली ही फसवणूक अत्यंत गंभीर असून शासनाने यामध्ये तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी करत संभाजी ब्रिगेडने निवेदनात खालील प्रमुख मुद्दे मांडले आहेत:
तात्काळ आर्थिक मदत: बोगस बियाण्यांमुळे नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांना शासनाने तात्काळ थेट आर्थिक मदत जाहीर करावी.
मोफत बियाणे पुरवठा: दुबार पेरणीसाठी बाधित शेतकऱ्यांना शासनामार्फत मोफत किंवा उच्च अनुदानित दरात दर्जेदार बियाणे व खते उपलब्ध करून द्यावीत.
तातडीने पंचनामे: कृषी विभागाने एसी केबिनमधून बाहेर पडून तातडीने शेतकऱ्यांच्या बांधावर जावे आणि नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत.
दोषींवर फौजदारी गुन्हे: बोगस बियाण्यांचा पुरवठा करणाऱ्या उत्पादक कंपन्या, वितरक आणि स्थानिक विक्रेत्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर व फौजदारी कारवाई करावी.
कडक नियंत्रण यंत्रणा: भविष्यात शेतकऱ्यांची अशी फसवणूक टाळण्यासाठी बियाणे विक्रीवर प्रभावी नियंत्रण ठेवणारी आणि गुणवत्ता तपासणारी सक्षम शासकीय यंत्रणा तातडीने कार्यान्वित करावी.
…अन्यथा तालुकाभर तीव्र आंदोलन पेटणार!
“शेतकऱ्यांचे होत असलेले प्रचंड आर्थिक नुकसान आणि मानसिक छळ लक्षात घेऊन शासनाने यावर तातडीने आणि सकारात्मक निर्णय घ्यावा. जर प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले, तर संभाजी ब्रिगेडच्या वतीने संपूर्ण कळंब तालुक्यात तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल,” असा स्पष्ट आणि इशारा संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
यावेळी निवेदन देताना संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक अतुल गायकवाड, जिल्हाध्यक्ष ॲड. अशोक चोंदे, महाराज सयाजीराजे गायकवाड ज्ञानदान कक्षाचे प्रतिनिधी, तालुकाध्यक्ष दत्ताभाऊ कवडे, तालुका उपाध्यक्ष जावेदभाई सौदागर, प्रसिद्धी प्रमुख ॲड. शिवराज मराठे, तसेच महादेव पांचाळ उपस्थित होते.यासह छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष इम्रान मिर्झा, पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे तालुकाध्यक्ष ईश्वर काळे, प्रदीप फरताडे, जनक कदम, आश्रुबा चोंदे, विलास गुंठाळ, सुदर्शन चोंदे, हरिश्चंद्र शंकर, इस्माईल हन्नूरे, भैरवनाथ जाधव यांच्यासह संभाजी ब्रिगेड व विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
