सराईत गुंडांना बेड्या..! जिल्ह्यात पाऊल ठेवताच हद्दपार केलेले ४ गुंडाना LCB ने ठोकल्या बेड्या..
महाराष्ट्र न्यूज 24 (अहिल्यानगर):-जिल्ह्यातून तडीपार (हद्दपार) केलेले गुंड पुन्हा गुपचूप शहरात फिरत असल्याच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) धडक कारवाई करत ४ सराईत आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या कडक सूचनांनंतर एलसीबीच्या पथकाने जाळे विणून एकाच दिवशी या चौघांना शहरात दबा धरून बसलेले असताना ताब्यात घेतले.अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ज्या गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे,ते जिल्ह्यात पुन्हा अवैधपणे वास्तव्य करत नाहीत ना,याची चाचपणी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश पोलीस अधीक्षक श्री.मुम्मका सुदर्शन यांनी दिले होते.या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तैनात करण्यात आले.या पथकामध्ये पोउपनि.अनंत सागलुडे,पोलीस अंमलदार विष्णु भागवत,अरुण गांगुर्डे, शाहिद शेख,फुरकान शेख, अशोक लिपणे,सागर ससाणे, रोहित येमुल,अमोल आजबे आणि चालक शिवप्रसाद काकडे यांचा समावेश होता.दि. २८ जुलै २०२६ रोजी एलसीबीचे पथक शहरातील तडीपार आरोपींचा शोध घेत असताना,गुप्त बातमीदाराकडून अत्यंत गोपनीय माहिती मिळाली.
हद्दपार केलेले चार गुन्हेगार अहिल्यानगर शहरात पुन्हा वास्तव्यास आले असून वेगवेगळ्या भागात फिरत आहेत,असा सुगावा पोलिसांना लागला.माहिती मिळताच पथकाने तातडीने सापळा रचून अहिल्यानगर शहरातील विविध भागांतून चौघांना ताब्यात घेतले.त्यांची कसून चौकशी केली असता सलमान उर्फ साहिल रफिक शेख (वय २५ वर्षे,रा.कापूरवाडी,ता.जि. अहिल्यानगर),अभिषेक गोरख घाडगे (वय २० वर्षे, रा. कापूरवाडी, ता.जि. अहिल्यानगर),हर्षवर्धन अरुण तापकीर (वय २५ वर्षे,रा. बुऱ्हाणनगर,ता.जि. अहिल्यानगर),गणेश विठ्ठल आव्हाड (वय २७ वर्षे,रा. गजानन कॉलनी,नवनागापूर; हल्ली रा.उभा मारुती, गांधीनगर, बोल्हेगाव,ता.जि. अहिल्यानगर) हे उपविभागीय दंडाधिकारी,अहिल्यानगर यांनी दिलेल्या हद्दपारीच्या आदेशाचे सर्रास उल्लंघन करून हे आरोपी शहरात बिनधास्त वावरत असल्याचे खात्रीशीर निष्पन्न झाले.
भिंगार कॅम्प व एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींवर महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत:भिंगार कॅम्प पोलीस ठाणे:
आरोपी क्र. १ ते ३ (सलमान शेख, अभिषेक घाडगे व हर्षवर्धन तापकीर) यांच्याविरोधात पोलीस कॉन्स्टेबल सतीश पोपट भवर (स्थानिक गुन्हे शाखा) यांच्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३९७/२०२६, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे:आरोपी क्र. ४ (गणेश आव्हाड) याच्याविरोधात पोलीस नाईक अशोक हिरामन लिपणे (स्थानिक गुन्हे शाखा) यांच्या फिर्यादीवरून एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात गु.र.नं. ५८१/२०२६, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
