शासकीय गाड्यांच्या काळ्या काचा अन् RTO कार्यालयात मनसेचा ठिय्या..! लिखित पुराव्या शिवाय माघार नाहीच,RTO कार्यालयात अधिकाऱ्यांची विनंती मनसेने थेट धुडकावली..मनसे तालुका अध्यक्ष अविनाश मुरलीधर पवार आक्रमक
महाराष्ट्र न्यूज 24 (अहिल्यानगर):-शासकीय नियमांची पायमल्ली करत वाहनांवर काळ्या काचा लावून मिरवणाऱ्या सरकारी गाड्यांवर कारवाई का होत नाही? या प्रश्नावरून पारनेरमधील महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) प्रचंड आक्रमक झाली आहे.पारनेर तहसीलदारांच्या शासकीय वाहनावरील काळ्या काचांवर कारवाई न केल्याच्या निषेधार्थ आज मनसेच्या वतीने प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO),अहिल्यानगर येथे उप अधीक्षक यांच्या दालनात थेट ‘ठिय्या आंदोलन’ पुकारण्यात आले.जोपर्यंत नियम मोडणाऱ्या जिल्ह्यातील सर्वच शासकीय वाहनांवर प्रत्यक्ष कारवाईचा लिखित अहवाल हातात पडत नाही, तोपर्यंत RTO कार्यालयातून एक पाऊलही मागे हटणार नाही,” असा एल्गार मनसे तालुका अध्यक्ष अविनाश मुरलीधर पवार यांनी पुकारला आहे.आंदोलनाची तीव्रता वाढताच RTO चे उपअधीक्षक माधव सूर्यवंशी यांनी आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी धाव घेतली. “उद्यापर्यंत या विषयावर लेखी खुलासा करू,कृपया आंदोलन थांबवा,” अशी विनंती सूर्यवंशी यांनी केली.मात्र,आक्रमक झालेल्या मनसैनिकांनी RTO प्रशासनाची ही विनंती जागीच धुडकावून लावली.
यावेळी प्रशासनाला खडे बोल सुनावताना मनसे तालुका अध्यक्ष अविनाश पवार म्हणाले, “सामान्य नागरिकाच्या गाडीला थोडी जरी काळी काच दिसली किंवा किरकोळ नियम मोडला,तर तुम्ही रस्त्यावरच त्याच्यावर दंडात्मक कारवाई करता. त्यावेळी तुम्ही त्यांना विचार करायला किंवा उद्या खुलासा करायला वेळ देता का? मग सरकारी अधिकाऱ्यांच्या गाड्यांना वेगळा न्याय आणि सामान्य जनतेला वेगळा न्याय का?” असा खरमरीत सवाल त्यांनी उपस्थित केला.चर्चेदरम्यान सूर्यवंशी यांनी ‘माझी महत्त्वाची मीटिंग आहे, मी जातो आणि तुम्हाला नंतर कारवाई करू’ असे सांगत निघण्याचा प्रयत्न केला. त्यावर पवार यांनी अधिकच आक्रमक होत, “साहेब, तुम्ही खुशाल मीटिंगला जा! पण जोपर्यंत प्रत्यक्ष कारवाई केल्याचा लिखित पुरावा आणि अहवाल आमच्या हातात मिळत नाही,तोपर्यंत आम्ही RTO च्या या दालनातून बाहेर पडणार नाही,” असा कडक इशारा दिला.मनसेच्या या अनपेक्षित आणि आक्रमक पवित्र्यामुळे RTO प्रशासनाची मोठी धांदल उडाली.अखेर RTO अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई करण्याचे तोंडी आश्वासन दिले असले,तरी मनसैनिकांनी ‘आश्वासन नको, थेट लिखित पुरावा द्या’ अशी ठाम भूमिका घेतली आहे.पारनेर तालुका मनसेच्या या आंदोलनामुळे शासकीय वर्तुळात आणि विशेषतः अधिकारी वर्गात मोठी खळबळ उडाली असून,नियम मोडणाऱ्या इतर शासकीय वाहन वापरणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.लिखित अहवाल मिळेपर्यंत हे ठिय्या आंदोलन असेच सुरू राहणार असल्याचा निर्धार मनसेने व्यक्त केला आहे.
