पारनेर तहसीलदारांवर शिस्तभंगाची कारवाई होत नाही तोपर्यंत मनसे शांत बसणार नाही मनसे तालुका अध्यक्ष अविनाश पवार
महाराष्ट्र न्यूज 24 (अहिल्यानगर):-पारनेर तहसीलदारांच्या शासकीय वाहनाला (MH 16 DG 8719) बेकायदेशीरपणे लावण्यात आलेल्या काळ्या काचांवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आता अत्यंत आक्रमक झाली आहे. मनसेच्या इशाऱ्यामुळे आणि संभाव्य कारवाईच्या भीतीने आरटीओ तपासणीपूर्वीच वाहनावरील काळ्या काचा काढण्यात आल्याचा खळबळजनक आरोप मनसेने केला आहे.मनसे पारनेर तालुका अध्यक्ष अविनाश पवार यांनी तहसीलदारांच्या गाडीवरील बेकायदेशीर काळ्या काचांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी आरटीओ (अहिल्यानगर) कडे निवेदनाद्वारे केली होती. कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता.त्यानंतर आरटीओ प्रशासनाने सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकांमार्फत तपासणी केली असता, “वाहनाला काळ्या काचा आढळल्या नाहीत,” असा अहवाल आरटीओने दिला. परंतु,मनसेच्या तीव्र आंदोलनाच्या धसक्याने आणि कारवाईच्या भीतीनेच आरटीओ तपासणीपूर्वी गाडीवरील काळी फ्रेम/फिल्म काढून टाकण्यात आल्याचा दावा मनसेने केला आहे.
आरटीओने दिलेल्या स्पष्टीकरणानंतरही मनसेने आपला लढा थांबवलेला नाही. जोपर्यंत पारनेर तहसीलदारांवर या प्रकरणी शिस्तभंगाची कारवाई होत नाही,तोपर्यंत मनसे शांत बसणार नाही,अशी ठाम भूमिका पक्षाने घेतली आहे.तहसीलदारांच्या गाडीवरून काळ्या काचा कधी आणि कुठे काढण्यात आल्या,याचे सत्य बाहेर आणण्यासाठी मनसे आता सीसीटीव्ही (CCTV) पुरावे गोळा करत आहे.हे सर्व पुरावे गोळा करून जिल्हाधिकारी तसेच महसूल विभाग आयुक्त (नाशिक) यांच्याकडे दोषी तहसीलदारांवर कडक शिस्तभंगाची कारवाई करण्यासाठी पत्रव्यवहार केला जाणार असल्याचे मनसेने स्पष्ट केले आहे.प्रशासनाच्या या भूमिकेमुळे मनसे विरुद्ध महसूल विभाग असा संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.
