राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाचा थरारक पाठलाग! बनावट विदेशी दारूसह लाखोंचा मुद्देमाल जप्त;एक अटकेत..
महाराष्ट्र न्यूज 24 (अहिल्यानगर):-अवैध मद्य तस्करी विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने पुन्हा एकदा आपला बडगा उगारला आहे.अधीक्षक श्री.नितीन घुले आणि उपअधीक्षक श्री. प्रविणकुमार तेली यांच्या मार्गदर्शनाखाली,भरारी पथक क्र.१ ने खर्डा-जातेगाव रोडवर सापळा रचून थरारक पाठलाग करत बनावट विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या एका आरोपीला गजाआड केले आहे.जातेगाव शिवार (ता. जामखेड) येथील रविराज अॅक्वा समोरून निनावी क्रमांकाच्या दुचाकीवरून अवैध मद्याची वाहतूक केली जात असल्याची गुप्त बातमी भरारी पथकाला मिळाली होती.पथकाने तात्काळ हालचाली करत संशयित चालकाचा पाठलाग केला व त्याला ताब्यात घेतले.
तपासा दरम्यान संभाजी पांडुरंग येताळ (वय ३३ वर्षे, रा.वाशी,ता.वाशी,जि. धाराशिव) याला अटक करण्यात आली असून त्याच्यावर ‘महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९’ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या धाडशी कारवाईत एकूण ₹१,९१,८५०/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.वाहने: १ निनावी क्रमांकाची हिरो स्प्लेंडर प्लस दुचाकी,मद्य: ७५० मिलीच्या ७५ प्लास्टिक बाटल्या (एकूण ५६.२५ बल्क लिटर बनावट विदेशी दारू),इतर साहित्य: १६० ‘इम्पिरियल ब्लू व्हिस्की’ची बनावट बुचे (Caps) ही धडक कामगिरी निरीक्षक श्री.सुरज कुसळे, दुय्यम निरीक्षक,श्री.आनंद जावळे व श्री.व्ही.जी.चव्हाण यांच्यासह जवान सुरज पवार, सुनील निमसे,चतुर पाटोळे, पांडुरंग गदादे,प्रथमेश पंडित आणि महिला जवान अर्चना दहिफळे यांच्या पथकाने केली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक श्री.व्ही.जी. चव्हाण करत आहेत.”अवैध मद्य निर्मिती,वाहतूक,विक्रीची ठिकाणे आणि अवैध ढाब्यांवर यापुढेही सातत्याने कठोर कारवाई केली जाईल,”असा स्पष्ट इशारा निरीक्षक सुरज कुसळे यांनी दिला आहे.
नागरिकांना आवाहन:
राज्य उत्पादन शुल्क विभागाने जनतेला आवाहन केले आहे की,परिसरात कोठेही अवैध दारूची निर्मिती, वाहतूक किंवा विक्री सुरू असल्यास खालील टोल-फ्री क्रमांकावर तात्काळ माहिती किंवा तक्रार नोंदवावी. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल.
📞 टोल फ्री क्रमांक: 18002339999
📱 व्हॉट्सॲप (WhatsApp) क्रमांक: 8422001133
