मोठी कारवाई..! हॉटेल ‘सम्यक’ आणि पत्र्याच्या शेडवर एलसीबीची लागोपाठ रेड 4 दारू माफिया गजाआड 10 लाखांचा मुद्देमाल जप्त..
महाराष्ट्र न्यूज 24 (अहिल्यानगर):-अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर व दारू माफियांवर पोलिसांनी आपला मोर्चा वळवला असून, स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने अकोले पोलीस ठाण्याच्या हद्दीत छापा मारून बेकायदेशीर दारू विक्रीचे मोठे रॅकेट उध्वस्त केले आहे.ब्राम्हणवाडा ते बोटा रस्त्यावर स्वामी समर्थ ॲक्वा शेजारील एका गुप्त पत्र्याच्या शेडमध्ये चालणाऱ्या या अड्ड्यावर कारवाई करत पोलिसांनी तब्बल १० लाख ५२ हजार ८९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून ४ आरोपींना गजाआड केले आहे.जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांची पाळेमुळे खणून काढत कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते.या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. संतोष मुटकुळे यांनी पोउपनि. विकास जाधव,पोलीस अंमलदार गणेश लोंढे,राहुल डोके,योगेश कर्डीले आणि आदिनाथ पाखरे यांचे विशेष पथक तयार करून अकोले परिसरात रवाना केले.दि.०४ ऑगस्ट २०२६ रोजी हे पथक अकोले परिसरात गस्त घालत असताना पथकाला अत्यंत गोपनीय माहिती मिळाली की, ब्राम्हणवाडा येथील रहिवासी अनिष बाबु पटेल हा ब्राम्हणवाडा ते बोटा रस्त्यावर स्वामी समर्थ ॲक्वा शेजारी असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदेशीरपणे देशी व विदेशी दारूचा साठा ठेवून विक्री करत आहे.
माहिती मिळताच एलसीबीच्या पथकाने पंचांना सोबत घेऊन सदर ठिकाणी अचानक धाड टाकली.पोलिसांना पाहताच तेथे दारू विक्री करणाऱ्यांची तारांबळ उडाली.पथकाने तत्परता दाखवत अनिष बाबु पटेल,नदीम याकुब पटेल,नाजीम अनिष पटेल,उत्तम आनंद शिंदे (वय ३४ वर्ष,रा.ब्राम्हणवाडा,ता. अकोले – हॉटेल सम्यक कारवाई) यातील तीन जणांना जागेवरच ताब्यात घेतले.पहिल्या छाप्यादरम्यान आरोपींकडून दारूचा साठा, मोबाईल आणि दारू वाहतुकीसाठी वापरली जाणारी वाहने जप्त करण्यात आली.याशिवाय,पथकाने ब्राम्हणवाडा येथील ‘हॉटेल सम्यक’ वर टाकलेल्या दुसऱ्या छाप्यात उत्तम आनंद शिंदे (वय ३४) यास बेकायदेशीर देशी दारू विक्री करताना पकडले असून त्याच्याकडून १,७९० रुपयांचा देशी दारूचा साठा जप्त केला आहे.या कारवाईनंतर अकोले पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) अन्वये दोन वेगवेगळे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.सदर प्रकरणाचा पुढील सखोल तपास अकोले पोलीस ठाणे करत आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री.मुम्मका सुदर्शन यांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, पोउपनि.विकास जाधव, पोलीस अंमलदार गणेश लोंढे, राहुल डोके,योगेश कर्डीले व आदिनाथ पाखरे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
