कायद्याच्या रक्षकांकडूनच कायद्याचा फज्जा! पारनेर तहसीलदारांच्या वाहनावर ‘नियमबाह्य’ लाल दिवा!..RTO कडून खोटी माहिती देऊन बचावाचा प्रयत्न; मनसे तालुकाध्यक्ष अविनाश पवार यांनी केला पुराव्यानिशी पर्दाफाश
महाराष्ट्र न्यूज २४ (अहिल्यानगर):-व्हीआयपी (VIP) संस्कृती संपवण्यासाठी केंद्र शासनाने २०१७ मध्येच केंद्रीय मोटार वाहन नियमात सुधारणा करून शासकीय वाहनांवरील लाल आणि निळे दिवे वापरण्यावर पूर्णपणे बंदी घातली आहे.हा अधिकार केवळ रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि पोलिसांसारख्या आणीबाणीच्या सेवा पुरवणाऱ्या वाहनांनाच आहे. असे असतानाही पारनेर तहसीलदार आपल्या शासकीय वाहनावर सर्रास नियमबाह्य लाल दिवा वापरत असल्याचा खळबळजनक आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पारनेर तालुका अध्यक्ष अविनाश मुरलीधर पवार यांनी केला आहे.पारनेर तहसीलदारांच्या MH 16 DG 8719 या शासकीय वाहनावर नियमबाह्य लाल दिवा वापरला जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर,मनसे तालुकाध्यक्ष अविनाश पवार यांनी प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO), अहिल्यानगर येथे रीतसर तक्रार दाखल केली होती.या तक्रारीवर RTO ने दि.२८ जुलै २०२६ रोजी दिलेल्या पत्रात (जा.क्र.१९४६) असा दावा केला की, “मोटार वाहन निरीक्षकांनी तपासणी केली असता वाहनावर काळ्या काचा आढळून आल्या नाहीत.”मात्र,प्रत्यक्ष तक्रार लाल दिव्याबाबत असताना आरटीओने भलतीच माहिती देऊन प्रकरणावर पांघरूण घालण्याचा आणि शासनाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला,असा थेट आरोप पवार यांनी केला आहे.
अविनाश पवार यांच्याकडे सदर वाहन लाल दिवा वापरत असतानाचे स्पष्ट फोटो आणि व्हिडिओ पुरावे उपलब्ध आहेत.अधिकाऱ्यांच्या या मनमानी आणि बेकायदेशीर कारभाराविरोधात अविनाश पवार यांनी आज प्रादेशिक परिवहन अधीक्षक,विभागीय आयुक्त,महसूल मंत्री आणि जिल्हाधिकारी यांना पुराव्यासह लेखी तक्रार सादर केली आहे.”कायद्याचे रक्षकच जर नियम मोडत असतील,तर सामान्य जनतेने कुणाकडे पाहायचे?” असा संतप्त सवाल यावेळी पवार यांनी उपस्थित केला.पारनेर तहसीलदार आणि खोटी माहिती देणाऱ्या संबंधित मोटार वाहन निरीक्षकावर तात्काळ शिस्तभंगाची व कायदेशीर कारवाई करावी,नियमबाह्य लाल दिवा वापरणाऱ्या वाहनावर तात्काळ दंडात्मक कारवाई करण्यात यावी,येत्या ७ दिवसांत योग्य ती कारवाई न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना,पारनेरच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल.
