अहिल्यानगरमध्ये अचानक का निर्माण झाले पाणी संकट? जाणून घ्या आज तुमच्या भागात पाणी कधी येणार..!
महाराष्ट्र न्यूज 24 (अहिल्यानगर):-अहिल्यानगर शहरात गुरुवारी (दि.६ ऑगस्ट २०२६) पहाटेच्या सुमारास पाणी पुरवठा व्यवस्थेवर मोठा घाला पडला.शहर पाणी पुरवठा योजनेच्या उच्च दाबाच्या वीज वाहिनीवर विळद पम्पिंग स्टेशन परिसरात अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने पहाटे ४:०० वाजेपासून सकाळी ७:१५ वाजेपर्यंत सलग साडेपाच तास वीज पुरवठा खंडित झाला होता.यामुळे संपूर्ण शहराची पाणी पुरवठा यंत्रणा पूर्णपणे विस्कळीत झाली असून नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.सकाळी ७:१५ वाजता महावितरणकडून वीज पुरवठा पूर्ववत झाल्यानंतर मुळानगर आणि विळद येथून टप्प्याटप्प्याने बंद पडलेला पाणी उपसा पुन्हा सुरू करण्यात आला.त्यानंतर वसंतटेकडी येथे सकाळी ९:३० वाजता पूर्ण क्षमतेने पाणी उपसा सुरू झाला.मात्र, पाणी वाटपाच्या ऐन मोक्याच्या वेळीच तब्बल ५.३० तास पाणी उपसा पूर्णपणे बंद राहिल्यामुळे शहरातील मुख्य वितरण टाक्या पूर्ण क्षमतेने भरू शकल्या नाहीत.टाक्या पूर्ण न भरल्याने गुरुवारी रोटेशननुसार पाणी वाटप असलेल्या मध्यवर्ती भागांत अत्यंत उशिराने आणि अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा झाला.यामध्ये प्रामुख्याने:
मध्यवर्ती भाग: मंगलगेट, रामचंद्रखुंट,झेंडीगेट, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, डाळमंडई, काळू बागवान गल्ली,धरती चौक, बंगाल चौकी, माळीवाडा, कोटी परिसर.इतर परिसर: गुलमोहर रोड, प्रोफेसर कॉलनी परिसर, सिव्हिल हाडको, प्रेमदान हाडको, टी.व्ही. सेंटर परिसर, म्युनिसिपल हाडको या भागांना कमी दाबाचा फटका बसला.पंपिंग ठप्प झाल्याचा सर्वात मोठा फटका उपनगरीय भागांना बसला आहे. महापालिकेकडून दिलेल्या माहितीनुसार, बोल्हेगाव,नागापूर, पाईपलाईन रोड परिसर,ढवणवस्ती संपूर्ण परिसर, लेखानगर आणि संचारनगर या उपनगर भागांत आज पाणीपुरवठा केला जाऊ शकलेला नाही.
या सर्व भागांतील नागरिकांना आता शुक्रवार, दि. ०७ ऑगस्ट २०२६ रोजी पाणी पुरवठा केला जाईल.
पाण्याचा वापर काटकसरीने करा – मनपाचे आवाहन अचानक उद्भवलेल्या या तांत्रिक अडचण आणि ऐनवेळी खंडित झालेल्या वीज पुरवठ्यामुळे झालेल्या गैरसोयीबद्दल प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे. सध्या उपलब्ध असलेल्या पाण्याचा नागरिकांनी अत्यंत काटकसरीने वापर करावा व महापालिकेस सहकार्य करावे,असे आवाहन अहिल्यानगर महानगरपालिकेच्या प्रसिद्धी विभागाद्वारे (प्र. प्रसिद्धी अधिकारी) करण्यात आले आहे.
