एलसीबीच्या कारवाईत २३ लाखांचा ऐवज जप्त अन् ८ जण गजाआड! शहरात अवैध मावा व सुगंधी तंबाखू माफियांचे धाबेच दाणाणले..!
महाराष्ट्र न्यूज 24 (अहिल्यानगर):-जिल्ह्यात अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी अहिल्यानगर पोलीस दलाने कंबर कसली आहे.स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) विशेष पथकाने एमआयडीसी आणि तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच वेळी ३ ठिकाणी छापे टाकून अवैध सुगंधी तंबाखू आणि मावा विक्रीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी तब्बल २३ लाख २९ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून,एकूण ८ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला जिल्ह्यातील अवैध धंद्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश दिले होते.या आदेशांनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. संतोष मुटकुळे यांनी तातडीने सूत्रे हलवत विशेष पोलीस अंमलदारांचे एक संयुक्त पथक तयार केले.या पथकाला एमआयडीसी आणि तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही इसम बेकायदेशीरपणे सुगंधी तंबाखू, सुपारी आणि मावा तयार करून त्याची शहरात छुप्या रीतीने विक्री करत असल्याची गुप्त बातमी मिळाली.
मिळालेल्या पक्क्या बातमीच्या आधारे एलसीबीच्या पथकाने पंचांसमक्ष तिन्ही ठिकाणी अचानक धाडी घातल्या.यावेळी प्रत्यक्ष घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात आरोग्यास घातक असलेला सुगंधी तंबाखू,मावा बनवण्याचे साहित्य आणि सुपारी असा एकूण २३,२९,९५० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वात पोलीस अंमलदार विजय ठोंबरे,अतुल लोटके,रमीझराजा आतार, सागर ससाणे,रणजीत जाधव, बिरप्पा करमल,विकास साळवे,दीपक जाधव,अमृत आढाव,निळकंठ कारखिले आणि भगवान सानप यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.एलसीबीच्या या धाडसी कारवाईमुळे अहिल्यानगर शहरातील अवैध सुगंधी तंबाखू आणि मावा विक्रेत्यांचे धाबे दणाणले असून,नागरिकांमधून पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक केले जात आहे.
