खुनाचा प्रयत्न,अपहरण अन् दहशत…’झिंग्या’ ची गुंडगिरी संपली;MPDA खाली थेट कोठडीत रवानगी!”
महाराष्ट्र न्यूज 24 (अहिल्यानगर):-साईनगरी शिर्डी आणि परिसरात स्वतःची दहशत निर्माण करून सर्वसामान्यांचे जगणे हतबल करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराविरोधात पोलिसांनी अखेर सर्वात मोठा आणि धडकी भरवणारा सर्जिकल स्ट्राइक केला आहे.खुनाचा प्रयत्न,अपहरण,अश्लील कृत्ये आणि जमावबंदीचे उल्लंघन करून शिर्डीत स्वतःची ‘अघोषित हुकूमशाही’ चालवणाऱ्या अनिकेत उर्फ ‘झिंग्या’ सुनिल शेजवळ (वय २८, रा.शिर्डी) याच्या आवळल्या गेलेल्या मुसक्यांमुळे गुन्हेगारी जगतात एकच खळबळ उडाली आहे.शिर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गैरकायद्याची मंडळी जमवून गुन्हे करणे हा झिंग्याचा नित्यक्रम बनला होता. त्याच्यावर शरीराविरोधात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.खुनाचा प्रयत्न करणे अपहरण करून जीवघेणा हल्ला करणे गंभीर दुखापत करणे व अश्लील कृत्ये
सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेचा बोजवारा उडवणे
याआधी त्याच्यावर करण्यात आलेली हद्दपारी आणि प्रतिबंधात्मक कारवाई फोल ठरत होती.कायद्याचा कोणताही धाक उरला नसल्याने त्याच्या समाजविघातक कृत्यांना वेसण घालणे पोलिसांसमोर मोठे आव्हान बनले होते.
झिंग्याची हीच वाढती गुंडगिरी मोडून काढण्यासाठी शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. रणजित गलांडे यांनी थेट एम.पी.डी.ए. (MPDA) कायद्यान्वये स्थानबद्धतेचा कडक प्रस्ताव तयार केला. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.अमोल भारती व अपर पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ वाकचौरे यांच्यामार्फत सादर करण्यात आलेल्या या प्रस्तावाची वरिष्ठ स्तरावर बारकाईने पडताळणी करण्यात आली.जिल्हादंडाधिकारी डॉ. श्री.पंकज आशिया यांनी प्रस्तावातील पुराव्यांची गांभीर्याने दखल घेत, सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी झिंग्याला स्थानबद्ध (MPDA) करण्याचे थेट आदेश जारी केले!आदेश निघताच पोलिसांनी झिंग्याला तात्काळ ताब्यात घेऊन थेट नाशिक मध्यवर्ती कारागृहात डांबले आहे.या दणकेबाज कारवाईमुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील गुन्हेगारी टोळ्यांचे धाबे दणाणले आहेत.ही यशस्वी कारवाई अपर पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ वाकचौरे,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.अमोल भारती, स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. श्री.संतोष मुटकुळे,पो.नि. श्री. रणजित गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली स.फौ. रवींद्र पांडे,पोहेकॉ.सुयोग सुपेकर आणि मपोकॉ सुनिता पवार यांच्या पथकाने फत्ते केली.
