मनसेचा दणका..! RTO ॲक्शन मोडमध्ये; अहिल्यानगर मधील शासकीय गाड्यांवरील काळ्या काचा काढण्याचे अखेर आदेश!..१५ दिवसांत काचा न काढल्यास..
महाराष्ट्र न्यूज 24 (अहिल्यानगर):-सामान्यांना हेल्मेट,सीटबेल्ट आणि काळ्या काचांवरून दंडाचा बडगा दाखवणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांचे पितळ उघडे पडले आहे.स्वतःनियम मोडत बेकायदेशीरपणे काळ्या काचा लावलेल्या गाड्यांमधून मिरवणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांना अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) चांगलाच दणका दिला आहे.मनसेच्या आक्रमक भूमिकेनंतर प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) ॲक्शन मोडमध्ये आले असून, अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व शासकीय वाहनांवरील काळ्या काचा तात्काळ काढण्याचे कडक आदेश जारी करण्यात आले आहेत.शासकीय अधिकाऱ्यांच्या वाहनांवर सर्रासपणे नियमबाह्य काळ्या काचा (Tinted Glass) लावण्यात आल्याची बाब समोर आली होती.यावर मनसे पारनेर तालुका अध्यक्ष श्री. अविनाश मुरलीधर पवार यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली.त्यांनी २९ जुलै २०२६ रोजी अहिल्यानगरच्या प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे पुराव्यासह लेखी तक्रार दाखल केली.
तक्रारीत श्री.पवार यांनी स्पष्ट बजावले होते की,
”सामान्य जनतेला शिस्त शिकवणारे अधिकारी स्वतःच कायदे मोडीत काढत आहेत. बेकायदेशीर काळ्या काचा असलेल्या शासकीय वाहनांवर तात्काळ कारवाई करून त्या काढण्यात याव्यात.अन्यथा मनसे कार्यकर्ते जिथे RTO किंवा शासकीय गाडी दिसेल, तिथे ती फोडतील.
मनसेच्या या थेट आणि कडक इशाऱ्यानंतर RTO प्रशासनाचे धाबे दणाणले.प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री.विनोद सगरे यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेत कार्यालयीन आदेश क्र.९९२ काढला आहे.अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व शासकीय वाहनांवरील बेकायदेशीर काळ्या काचा तात्काळ काढून कायदेशीर कारवाई करणे,तालुकास्तरावर तपासणी जिल्ह्यातील सर्व तालुकानिहाय मोटर वाहन निरीक्षकांनी शासकीय वाहनांची कडक तपासणी करून दोषी आढळणाऱ्या वाहनांवर मोटर वाहन कायद्यानुसार कारवाई करावी.केलेल्या संपूर्ण कारवाईचा सविस्तर अहवाल वरिष्ठांकडे सादर करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
