कराड हादरलं! न्यायाचा कोट घालणाऱ्या वकिलाचा घरातच अमानुष हैदोस; ‘आदिशक्ती’चा सडेतोड प्रहार!मुलगी अन् पत्नीवर भयानक अत्याचार; ‘ॲट्रॉसिटी’ ची धमकी देणाऱ्या विकृताच्या दारात ‘निर्भया’सह आदिशक्ती महासंघाचा दणका!
कराड (प्रतिनिधी):-समाजात न्यायाच्या गप्पा मारणारा आणि कोर्टात काळा कोट घालून फिरणारा एक वकील स्वतःच्याच घरात भक्षक बनल्याचा धक्कादायक प्रकार कराडमध्ये उघडकीस आला आहे.दारूच्या नशेत धुंद होऊन पोटच्या दोन लहान मुलींना अमानुष मारहाण करणे, पत्नीच्या जेवणाच्या ताटात थुंकणे आणि स्वतःची घाण चिमुकल्यांकडून साफ करून घेणे,अशा माणुसकीला काळीमा फासणाऱ्या विकृतीचा पर्दाफाश झाला आहे.या अन्यायाविरुद्ध ‘आदिशक्ती महासंघा’च्या संस्थापक/अध्यक्षा अश्विनीताई वेताळ पाटील व त्यांच्या सहकारी यांनी आक्रमक भूमिका घेत थेट पोलिसांच्या ताफ्यासह संबंधित वकिलाच्या दारात धडक दिली असून,पीडित महिला आणि चिमुकल्यांची या नरकयातनेतून सुटका केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,या वकिलावर २०२२ मध्ये स्वतःच्याच मुलीच्या बाबतीत ‘पोक्सो’ (POCSO) अंतर्गत गंभीर गुन्हा दाखल झाला होता.मात्र, त्यावेळी पत्नीला भीती दाखवून व माफी मागून त्याने तो गुन्हा मागे घ्यायला लावला होता.परंतु,त्याची ही विकृती थांबली नाही.रोज रात्री दारूच्या नशेत चिमुकल्या ९ आणि १५ वर्षांच्या मुलींवर अत्याचार करणे आणि पत्नीचा छळ करणे हा त्याचा नित्यक्रम बनला होता.रात्री पीडित महिलेने अत्यंत भीतीच्या वातावरणात अश्विनीताई वेताळ पाटील यांच्याशी संपर्क साधून आपबीती सांगितली.ही गोष्ट समजताच संबंधित वकिलाने दुसऱ्या एका मध्यस्थ वकिलामार्फत “ह्या प्रकरणात पडू नका,नाहीतर खोटे गुन्हे व ॲट्रॉसिटी दाखल करून बदनामी करीन” अशी धमकी दिली.मात्र,या पोकळ धमक्यांना न जुमानता ‘आदिशक्ती’ महासंघ पीडितांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला.घटनेचे गांभीर्य ओळखून अश्विनीताई वेताळ पाटील यांनी तात्काळ सातारा येथून ‘बाल हक्क’च्या शिंदे मॅडम व त्यांची टीम,निर्भया पथक’च्या पाटील मॅडम, महिला पोलीस कॉन्स्टेबल आणि आदिशक्ती महासंघाच्या मुल्ला मॅडम यांना सोबत घेऊन थेट वकिलाचे घर गाठले.पोलिसांनी आणि आदिशक्तीच्या टीमने पीडित आई आणि दोन्ही लहान मुलींना विश्वासात घेऊन त्यांच्या मनातील भीती दूर केली.पोलिसांकडून आता या वकिलावर कडक कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे.”जो माणूस स्वतःच्या घरात पोटच्या लेकरांवर अन् बायकोवर असा अमानुष अत्याचार करतो, त्याने बाहेर न्यायाच्या बाता मारणे हा ढोंग आहे.
अशा विकृत मनोवृत्तीच्या वकिलाची ‘सनद’ (Practice License) बार कौन्सिलने तातडीने रद्द केली पाहिजे.कराडमधील सर्व वकिलांनी एकत्र येऊन अशा काळ्या डागाला वकिली पेशातून हाकलून दिले पाहिजे अशी मागणी अश्विनीताई वेताळ पाटील यांनी यावेळी केली.कायद्याच्या चौकटीत राहून आणि लहान मुलांचे भविष्य व सुरक्षितता लक्षात घेऊन सध्या या वकिलाचे नाव गुप्त ठेवण्यात आले आहे. मात्र,जर या माणसाने धमक्या देणे किंवा विकृती दाखवणे थांबवले नाही,तर योग्य वेळ आल्यावर नाव,फोटो आणि व्हिडिओ पुराव्यासहित सर्व जनतेसमोर जाहीर करू,असा थेट इशारा आदिशक्ती महासंघाने दिला आहे.
