धक्कादायक..३४ लाखांची ‘फॉर्च्युनर’ लाटली..उर्वरित पैसे न देता गाडीची विल्हेवाट लावली..काय आहे प्रकरण वाचा सविस्तर..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-गाडी खरेदीचा व्यवहार करायचा,आधी काही रक्कम देऊन विश्वास संपादन करायचा आणि उर्वरित लाखो रुपयांना चुना लावून गाडीच परस्पर गायब करायची… अशाच एका थरारक आणि फसवणुकीच्या प्रकाराने अहिल्यानगर शहरात खळबळ उडवून दिली आहे.३४ लाख ५० हजार रुपयांच्या ‘टोयोटा फॉर्च्युनर’ कारच्या व्यवहारात तब्बल ६ लाख ५५ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कर्जत येथील एकावर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सावेडी परिसरातील कुष्ठधाम रस्त्यावर राहणारे आणि जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणारे व्यावसायिक कृष्णा दगडू शिंदे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.५ जुलै रोजी प्रेमदान चौकातील एका कार्यालयासमोर कृष्णा शिंदे यांच्या टोयोटा फॉर्च्युनर कारचा (क्र.MH 16 DM 8595) ३४ लाख ५० हजार रुपयांना खरेदीचा सौदा ठरवला होता.
व्यवहार ठरल्यानंतर घुले यांनी “तीनच दिवसांत सर्व उर्वरित पैसे चुकते करतो,” असा पक्का शब्द देऊन गाडीचा ताबा आपल्याकडे घेतला. सुरुवातीला त्यांनी २७ लाख ९५ हजार रुपये दिले.मात्र,उर्वरित ६ लाख ५५ हजार रुपये देण्यास टाळाटाळ सुरू केली.शिल्लक पैशांसाठी कृष्णा शिंदे यांनी वारंवार तगादा लावला;परंतु त्यांनी उर्वरित रक्कम दिली नाही आणि गाडीही परत केली नाही.इतकेच नव्हे,तर ती महागडी फॉर्च्युनर गाडी इतर कोणालातरी देऊन तिची परस्पर विल्हेवाट लावली.आपली फसवणूक झाल्याची खात्री पटताच शिंदे यांनी थेट पोलिसांत धाव घेतली.कृष्णा शिंदे यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात घुले यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली पोकॉ.भागवत भागवत बांगर करत आहेत.
