भुईकोट किल्ला..ऐतिहासिक पाऊल! अहिल्यानगरच्या वैभवाला मिळणार जागतिक पर्यटनाचा साज..अखेर लष्कराचा हिरवा कंदील..पालकमंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील व आमदार संग्राम जगताप यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-अहिल्यानगरच्या सुवर्ण इतिहासाचा मूक साक्षीदार असलेल्या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याचे रूपडे आता पालटणार आहे.गेल्या अनेक दिवसांपासून लष्कराच्या परवानगीअभावी प्रलंबित असलेल्या विकास प्रकल्पातील सर्व अडथळे अखेर दूर झाले आहेत. महाराष्ट्र शासन आणि नगर लष्कर विभाग यांच्यात ऐतिहासिक सामंजस्य करार (MoU) संपन्न झाल्याने, केंद्र सरकारच्या ‘स्वदेश दर्शन २.०’ अंतर्गत या किल्ल्याच्या जागतिक दर्जाच्या कायापालटाला प्रत्यक्ष सुरुवात होत आहे.जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया आणि लष्कराचे स्टेशन कमांडर पी. सुनील कुमार यांच्या स्वाक्षरीने हा करार पार पडला.किल्ल्याचे मूळ ऐतिहासिक स्वरूप व तटबंदी सुरक्षित ठेवून पर्यटकांना आंतरराष्ट्रीय दर्जाचा अनुभव मिळावा, यासाठी विशेष आराखडा तयार करण्यात आला आहे.१३७० मीटरचा ‘नेचर वॉकवे’: बुरुज क्रमांक १ ते ११ दरम्यान निसर्गरम्य पदपथ,जिथून किल्ल्याच्या भव्यतेचे विहंगम दृश्य अनुभवता येईल.आधुनिक ‘इंटरप्रिटेशन सेंटर’: किल्ल्याचा गौरवशाली इतिहास, वास्तुशैली आणि घटनांची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी आधुनिक माहिती केंद्र.मुक्त नाट्यगृह (Open Air Theatre): किल्ला परिसरात कला आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या सादरीकरणासाठी भव्य खुले रंगमंच.स्मार्ट आणि इको-फ्रेंडली सुविधा: संपूर्ण परिसरात सोलर स्ट्रीट लाईटिंग, सुसज्ज वाहनतळ,भव्य प्रवेशद्वार आणि आधुनिक स्वच्छतागृहांची निर्मिती.इच्छाशक्ती आणि पाठपुराव्याला आलेले यश केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाकडून १७ मार्च २०२५ रोजी या प्रकल्पाला प्रशासकीय व वित्तीय मंजुरी मिळाली होती.
मात्र,किल्ला लष्कराच्या अखत्यारीत असल्याने विकासकामांना लष्कराच्या अंतिम मान्यतेची प्रतीक्षा होती.पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांनी सातत्याने केलेल्या समन्वयामुळे सैन्यदल व शासनामध्ये हा करार शक्य झाला.भारतीय पुरातत्त्व विभाग,वन विभाग आणि पर्यावरण विभागाच्या आवश्यक तांत्रिक मान्यतांची पूर्तता करून ही विकासकामे युद्धपातळीवर सुरू केली जाणार आहेत.या प्रकल्पामुळे अहिल्यानगर केवळ ऐतिहासिक केंद्र न राहता, महाराष्ट्राच्या नकाशावरील एक प्रमुख पर्यटन केंद्र म्हणून नावारूपास येणार आहे.
