घरामागे बांधून ठेवलेल्या गोवंशांची सुटका पोलिसांच्या एका ‘ॲक्शन’ ने अवैध कत्तलखान्याचा डाव उधळला..!
अहिल्यानगर/जामखेड:-जामखेड शहरातील कुरेशी मोहल्ल्यात सुरू असलेल्या एका संशयास्पद हालचालीवर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) ने मध्यरात्रीच्या सुमारास जोरदार छापा टाकत मोठा कट उधळून लावला.घराच्या मागील मोकळ्या जागेत कत्तलीसाठी निर्दयतेने डांबून ठेवलेल्या गोवंशांची सुखरूप सुटका करण्यात आली असून, घटनास्थळावरून एका तरुणाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.जिल्ह्यात गोवंश तस्करी व अवैध कत्तलींवर पूर्णपणे आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला कठोर पावले उचलण्याचे थेट निर्देश दिले होते.या आदेशानुसार पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक जामखेड परिसरात गस्त घालत होते.गस्तीदरम्यान पोलिसांच्या गुप्तहेरांकडून खात्रीशीर माहिती मिळाली की,सदाफुले वस्ती,कुरेशी मोहल्ला येथील जमीर कुरेशी याच्या घरामागील मोकळ्या जागेत गोवंशीय जनावरे कत्तल करण्याच्या हेतूने अत्यंत क्रूरपणे डांबून ठेवण्यात आली आहेत.मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांसह तत्काळ घटनास्थळी धाव घेत छापा टाकला.
घटना स्थळावरून मोहंमद साद कुरेशी (वय १९ वर्ष,रा. सदाफुले वस्ती,जामखेड) याला पोलिसांनी ताब्यात घेतले.पोलिसांनी घटनास्थळावरून सुमारे ३,००,०००/- (तीन लाख रुपये) किमतीच्या गायी/गोवंशांची सुटका केली.पकडण्यात आलेल्या आरोपीविरुद्ध जामखेड पोलीस ठाण्यात गु.र.नं. ६०४/२०२६ अन्वये महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम (सुधारित २०१५) चे कलम ५(ब), ९ सह प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंधक कायदा कलम ३ व ११ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही धडक कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, पोलीस अंमलदार अरूण गांगुर्डे,मनोज साखरे, भाऊसाहेब काळे,रोहित मिसाळ आणि दिपक जाधव यांच्या पथकाने केली.या प्रकरणाचा पुढील तपास जामखेड पोलीस करत आहेत.
