मनसे नेते अमित ठाकरेंवरील गुन्हा मागे घ्या,अन्यथा ‘मनसे स्टाईल’ भडका!पारनेर मनसेचा सुपा पोलिसांना थेट इशारा..शिवरायांच्या सन्मानासाठी आक्रमक..
पारनेर/सुपा (विशेष प्रतिनिधी):-पुणे येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील वसतिगृहात विद्यार्थ्यांना सडलेले आणि निकृष्ट दर्जाचे अन्न दिले जात असल्याच्या गंभीर तक्रारीनंतर प्रत्यक्ष पाहणीसाठी गेलेले मनसे नेते अमित ठाकरे यांच्यावर राजकीय आकसापोटी आणि किरकोळ कारणावरून चतुःशृंगी पोलीस ठाण्यात खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या सूडबुद्धीच्या कारवाई विरुद्ध संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असून पारनेर तालुका मनसेने आक्रमक पवित्रा घेत सुपा पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांना धडक निवेदन दिले.”छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान ही आमची अस्मिता आहे! या अस्मितेसाठी आणि विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आमच्यावर कितीही गुन्हे दाखल झाले तरी महाराष्ट्र सैनिक एक पाऊलही मागे हटणार नाही,” असा ठाम आणि रोखठोक इशारा यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांनी दिला. हा खोटा गुन्हा तात्काळ मागे न घेतल्यास सुपा पोलीस ठाण्यासमोर ‘मनसे स्टाईल’ने तीव्र आणि चक्काजाम आंदोलन छेडण्यात येईल, असा सज्जड इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांना किडेयुक्त, सडलेले अन्न देणाऱ्या संबंधित कॅन्टीन ठेकेदारावर तत्काळ कठोर कायदेशीर कारवाई करावी.महापुरुषांच्या सन्मानाला बाधा पोहोचवून त्यांच्या शेजारी स्वतःचा फोटो लावणाऱ्या संबंधित उद्धट प्राचार्यांवर गुन्हा दाखल करावा.विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी धावून गेलेल्या मनसे नेते अमित ठाकरे यांच्यावरील दाखल केलेला राजकीय बनावाचा खोटा गुन्हा विनाअट मागे घ्यावा.असे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष तथा पारनेर तालुकाध्यक्ष अविनाश पवार यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.या आंदोलनात सुपा शहर अध्यक्ष अक्षय सूर्यवंशी,पारनेर तालुका उपाध्यक्ष विरेंद्र थोरात,पारनेर शहर अध्यक्ष सतीश म्हस्के यांच्यासह तालुक्यातील शेकडो महाराष्ट्र सैनिक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
