रात्रीच्या अंधारात वाळू उपसा बेतला अंगाशी..! एलसीबीची ‘या’ तालुक्यात ‘धडक सर्जिकल स्ट्राईक..तब्बल २० लाखांचा ऐवज जागेवरच जप्त वाळू माफियांचे धाबे दणाणले..!
अहिल्यानगर प्रतिनिधी:-जिल्ह्यात बेकायदेशीर वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्या टोळ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) एकाच रात्रीत जोरदार प्रहार केला आहे.पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या थेट आदेशानंतर एलसीबीच्या विशेष पथकाने श्रीरामपूर आणि राहाता परिसरामध्ये गुप्त माहितीच्या आधारे अचानक छापे टाकून वाळू माफियांचे नेटवर्क उद्ध्वस्त केले.या धडक कारवाईत २० लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून माफियांचे धाबे पार दणाणले आहेत.पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली अंमलदार गणेश लोंढे,निळकंठ कारखेले, रणजीत जाधव,बाळासाहेब गुंजाळ व सतीष भवर यांच्या पथकाने १ सप्टेंबर रोजी रात्री सापळा रचून दोन वेगवेगळ्या ठिकाणी ही कारवाई केली.श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत छापा टाकून ५ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणात रोमन सलीम पठाण (वय २२, रा.सम्राटनगर,श्रीरामपूर) याला जागीच पकडण्यात आले,तर त्याचा साथीदार आकाश परदेशी (रा. आदर्शनगर,श्रीरामपूर) अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला.तसेच राहाता पोलीस स्टेशन हद्दीत दुसऱ्या कारवाईत तब्बल १५ लाख २० हजार रुपयांचा ऐवज जप्त केला गेला.या कारवाईत जावेद नजीर शेख (वय ३७,रा. पुणतांबा) आणि फरियाद उर्फ गुड्डू फिरोज शेख (वय २८,रा. श्रीरामनगर,शिर्डी) या दोघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.या दोन्ही कारवायांमध्ये एकूण ४ आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले असून तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.फरार आरोपीचा पोलीस कसून शोध घेत आहेत.स्थानिक गुन्हे शाखेच्या या दणक्यामुळे जिल्ह्यातील अवैध वाळू तस्करांचे धाबे दणाणले असून बेकायदेशीर धंदे करणाऱ्यांविरोधात अशीच कठोर मोहीम पुढेही सुरू राहील,असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
