५६ वर्षीय महिलेचा कारनामा उघड..एलसीबीचा ‘डमी ग्राहक’ आणि बंद दाराआडच्या काळ्या धंद्याचा पर्दाफाश..! वाचा सविस्तर..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-बाहेरून सर्वसामान्य दिसणारं एक शांत घर…पण आत मात्र पैशांच्या हव्यासापोटी सुरू होता महिलांच्या अब्रूचा बाजार! अहिल्यानगरच्या एमआयडीसी परिसरातील गजानन कॉलनीमध्ये चालणाऱ्या एका हाय-प्रोफाइल कुंटणखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) ने धाडसी कारवाई करत मोठा पर्दाफाश केला आहे.या कारवाईत ५६ वर्षीय महिलेला बेड्या ठोकण्यात आल्या असून तीन पीडित तरुणींची नरकयातनेतून सुटका करण्यात आली आहे.
एमआयडीसी परिसरातील एका घरात रजनी प्रभाकर डहाळे (वय ५६) ही महिला इतर महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून देहव्यापार करवून घेत असल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती.माहिती मिळताच पोलिसांनी थेट धाड न टाकता फिल्मी स्टाईलने सापळा रचला.खात्री करण्यासाठी पोलीस पथकातील एका अंमलदाराला ‘बनावट ग्राहक’ (डमी कस्टमर) बनवून त्या घरात पाठवण्यात आले.आत जाताच सौदा पक्का झाला आणि वेश्याव्यवसाय सुरू असल्याची खात्री पटताच बाहेर दबा धरून बसलेल्या पथकाने घरात जोरदार एन्ट्री केली.पंच आणि महिला पोलिसांच्या उपस्थितीत घराची कसून झडती घेण्यात आली असता, तिथे ३ पीडित महिला मिळून आल्या.चौकशी दरम्यान त्या महिलांनी सांगितले की, “रजनी डहाळे ही ग्राहकांकडून मोठी रक्कम उकळायची आणि त्यातील काही पैसे आम्हाला देऊन आमच्याकडून जबरदस्तीने हा व्यवसाय करून घेत होती.”यानंतर पोलिसांनी तातडीने त्या तिन्ही महिलांची तिथून सुटका केली.स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी आणि उपजीविकेसाठी महिलांचा व्यापार करणाऱ्या आरोपी रजनी डहाळे हिच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात ‘पिटा’ (PITA – स्त्रिया व मुली यांचे अनैतिक व्यापारास प्रतिबंध कायदा १९५६) च्या विविध कलमांन्वये गुन्हा (गु.र.नं. ७०१/२०२६) दाखल करण्यात आला आहे.ही धडक कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणार्थी डीवायएसपी कल्पना पवार,एलसीबीचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे,पीएसआय संदीप दरवडे,पोलीस अंमलदार विकास साळवे,विष्णु भागवत,शाहीद शेख,बिरप्पा करमल,अशोक लिपणे, विजय ठोंबरे आणि महिला पोलीस अंमलदार चिमा काळे यांनी केली आहे.
