नात्यांचा उत्सव,संस्कारांची वीण! जि.प.शाळा निमगाव खैरीत रक्षाबंधनाचा अनोखा रंग;विद्यार्थ्यांनी स्वतःबनवल्या पर्यावरणपूरक राख्या
श्रीरामपूर (विशेष प्रतिनिधी):-सण केवळ परंपरेपुरते मर्यादित न ठेवता त्यातून मूल्ये आणि संस्कृती कशी रुजवावी,याचा उत्तम आदर्श श्रीरामपूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,निमगाव खैरी येथे पाहायला मिळाला.शाळेच्या प्रांगणात रक्षाबंधनाचा पवित्र सण अत्यंत उत्साही,आनंदी आणि भावनिक वातावरणात साजरा करण्यात आला. बहिणींनी हाताने बनवलेली राखी आणि भावांनी परतीची भेट म्हणून दिलेले शैक्षणिक साहित्य या अनोख्या देवाणघेवाणीने उपस्थित सर्वांचीच मने जिंकली.रक्षाबंधनाचे औचित्य साधून शाळेत विद्यार्थ्यांसाठी विशेष ‘राखी बनविण्याची कार्यशाळा’ आयोजित करण्यात आली होती.शिक्षकांच्या कल्पक मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी घरगुती व टाकाऊ वस्तूंपासून तसेच पर्यावरणपूरक साहित्यापासून मनमोहक राख्या तयार केल्या.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलतेला (Creativity) नवा वाव मिळालाच,शिवाय बालवयातच पर्यावरण संवर्धनाचा अत्यंत महत्त्वाचा संदेश त्यांच्या मनावर कोरला गेला.कार्यक्रमादरम्यान शिक्षकांनी विद्यार्थ्यांना भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचे महत्त्व,परस्पर आदर, आपुलकी आणि सुरक्षिततेची जबाबदारी याविषयी मार्गदर्शन केले.यानंतर विद्यार्थिनींनी पारंपरिक पद्धतीने औक्षण करून स्वतः हाताने बनविलेल्या देखण्या राख्या आपल्या वर्गमित्र-भावांच्या मनगटावर बांधल्या.या प्रेमाला भावांनीही तितक्याच सुंदर पद्धतीने दाद दिली.केवळ पैसे किंवा मिठाई न देता,मुलांनी आपल्या लाडक्या बहिणींना वही,पेन,पेन्सिल यांसारखे शैक्षणिक साहित्य भेट दिले.शिक्षणाची साथ हीच खरी बहिणीची सुरक्षा,” हा नवा आदर्श या चिमुकल्यांनी घालून दिला.भारतीय संस्कृती आणि परंपरेचा वारसा नव्या पिढीत जिवंत ठेवतानाच,सणांमागील सामाजिक जाणीव कशी जपावी,याचे उत्तम दर्शन या उपक्रमातून घडले.शाळेच्या या संवेदनशील आणि कल्पक उपक्रमाचे पालक व ग्रामस्थांकडून मोठे कौतुक होत आहे.हा सुंदर सोहळा यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक संतोष वाघमोडे यांच्या नेतृत्वाखाली शिक्षिका प्रतिभा तोरणे,मीना निकम, सुधा गमे आणि जयश्री दिवटे यांनी विशेष परिश्रम घेतले. बालमनावर संस्कार आणि पर्यावरण मूल्यांची रुजवणूक करणाऱ्या या उपक्रमामुळे परिसरात शाळेचे कौतुक होत आहे.
