निंबळक बायपासवर भीषण थरार:भरधाव कंटेनर-व्हॅनच्या धडकेत ड्रायव्हरचा जागीच मृत्यू?
अहिल्यानगर (प्रतिनिधी):अहिल्यानगर शहराजवळील निंबळक बायपास रस्त्यावर आज रात्री उशिरा एक काळीज पिळवटून टाकणारा भीषण अपघात घडला.भरधाव वेगात असलेल्या कंटेनरला व्हॅनची जोरदार धडक लागली.ही धडक इतकी भीषण होती की, व्हॅनचा चक्काचूर झाला असून दुर्दैवाने व्हॅन चालकाचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती मिळत आहे.रात्री सुमारे 10.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार,निंबळक बायपास परिसरातील मुख्य रस्त्यावरून व्हॅनने समोरून जाणाऱ्या वेगाने एका महाकाय कंटेनरला व्हॅनला जोरदार धडक दिली.धडक इतकी जोरदार होती की,वाहनांचा कानठळ्या बसवणारा आवाज दूरवर ऐकू गेला.या भीषण आघातामध्ये व्हॅनचा पुढचा भाग अक्षरशः दबला गेला.आत बसलेला चालक गंभीररीत्या अडकला आणि जबर मार लागल्यामुळे त्याचा घटनास्थळावरच जीव गेला.अपघाताचा मोठा आवाज ऐकताच आजूबाजूचे नागरिक आणि महामार्गावरून जाणारे इतर वाहनचालक मदतीसाठी धावून आले.घटनेचे गांभीर्य ओळखून नागरिकांनी तातडीने पोलिसांना या अपघाताची माहिती दिली.माहिती मिळताच स्थानिक पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
स्थानिकांच्या मदतीने व्हॅनमध्ये अडकलेल्या चालकाला बाहेर काढण्यात आले,मात्र तोपर्यंत त्याची प्राणज्योत मालवली होती.बायपासवरील वाहतूक काही काळ विस्कळीत या अपघातामुळे बायपास मार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.पोलिसांनी तत्परता दाखवत क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला केली आणि वाहतूक सुरळीत केली.पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी (शवविच्छेदन) शासकीय रुग्णालयात पाठवला आहे.मयत चालकाची ओळख पटवण्याचे काम सुरू असून,कंटेनर चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.निंबळक बायपास रस्त्यावर रात्रीच्या वेळी वाहने अत्यंत सुसाट धावत असतात.अनेक ठिकाणी पथदिव्यांची कमतरता आणि वेगावर नियंत्रण नसल्यामुळे हा मार्ग धोकादायक ठरत असल्याच्या तक्रारी स्थानिकांमधून सातत्याने होत आहेत. आजच्या या भीषण अपघातामुळे पुन्हा एकदा बायपासवरील वाहतूक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून,रात्रीच्या वेळी गस्त आणि वेगमर्यादेवर कडक नियंत्रण आणण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.
