एसटी बसमध्ये चढताना क्षणार्धात दागिने गायब..थेट बीडहून अहिल्यानगर मध्ये आलेल्या ‘त्या’ टोळीचा असा लागला सुगावा स्थानिक गुन्हे शाखेची थरारक कारवाई! वाचा सविस्तर..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-एसटी बसमध्ये चढताना महिला प्रवाशांच्या गर्दीचा गैरफायदा घेऊन दागिने लंपास करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पर्दाफाश केला आहे.कर्जत बसस्थानकावर घडलेल्या चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावत पोलिसांनी बीड येथील एका पुरुषासह दोन महिलांना मिरजगाव येथून जेरबंद केले असून त्यांच्याकडून ६ लाख ७५ हजार रुपये किमतीचे ४५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण हस्तगत केले आहे.दि.२७ ऑगस्ट २०२६ रोजी फिर्यादी अयोध्या दिगंबर कोरडे (वय ६२,रा.शिक्षक कॉलनी,कर्जत) या जामखेडला जाण्यासाठी कर्जत बसस्थानकावरून एसटी बसमध्ये चढत होत्या. प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने अत्यंत शिताफीने लंपास केले. या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी तपास पथक तयार केले.गोपनीय बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार,ही चोरी बीड येथील टोळीने केल्याचे समोर आले.
संशयित आरोपी मिरजगाव बसस्थानक परिसरात आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ सापळा रचून परशुराम मल्हारी गायकवाड (वय ४५,रा.सुभाष कॉलनी पेठ,बीड),लक्ष्मी संजय लोखंडे (वय ५९,रा. मोहटादेवी मंदिरामागे, वडवणी,ता.बीड),पुजा विशाल मोहिते (वय २७,रा.नाळवंडी नाका,शास्त्रीनगर,बीड) या तिघांना ताब्यात घेतले.चौकशी दरम्यान या टोळीतील चौथी साथीदार कौसाबाई सर्जेराव गायकवाड (रा.गांधीनगर,ता. बीड) ही फरार असल्याचे निष्पन्न झाले आहे.आरोपींकडे कसून चौकशी केली असता परशुराम गायकवाड याने चोरीचे काही दागिने नातेवाईकाकडे ठेवल्याचे कबूल केले.पोलिसांनी पंचांसमक्ष ६,७५,००० रुपये किमतीचे ४५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण जप्त केले आहे. ताब्यात घेतलेल्या तिन्ही आरोपींना मुद्देमालासह पुढील कारवाईसाठी कर्जत पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे.सदरची धडक कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे,पोलीस अंमलदार श्यामसुंदर जाधव, प्रताप देवकाते,अमोल कोतकर,मनोज साखरे,योगेश कर्डीले,महादेव भांड,फुरकान शेख,प्रशांत राठोड व ज्योती शिंदे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
