सुपा चौकातील कोंडी फोडा,नाहीतर मनसे स्टाईल दणका अटळ!रस्ता २२ मीटर रुंद करा आणि अतिक्रमणे हटवा;तहसीलदार व PWD ला अविनाश पवारांचा थेट ‘अंतिम इशारा’..
पारनेर (विशेष प्रतिनिधी):-सुपा परिसरातील जीवघेणी वाहतूक कोंडी, रस्त्यांची चाळण आणि बळावलेल्या अतिक्रमणांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता थेट आक्रमक पवित्रा घेतला आहे. सुपा चौक ते एमआयडीसी चौक या रस्त्याचे तात्काळ २२ मीटर रुंदीकरण करावे आणि अहिल्यानगर-पुणे महामार्गावरील अतिक्रमणांवर तातडीने बुलडोझर फिरवावा,या प्रमुख मागण्यांसाठी मनसे तालुकाप्रमुख अविनाश पवार यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाला कडक शब्दांत निवेदन देण्यात आले.पारनेरचे तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे (PWD) कार्यकारी अभियंता यांना दिलेल्या निवेदनात सुपा येथील गंभीर वास्तवावर बोट ठेवण्यात आले.
सुपा हे औद्योगिक,शैक्षणिक आणि आर्थिक केंद्र असल्याने दररोज हजारो वाहनांची वर्दळ असते.दुतर्फा झालेल्या अनधिकृत बांधकामांमुळे रस्ता निम्म्यावर आला असून, खड्ड्यांमुळे अपघातांची मालिका सुरू आहे.अरुंद रस्त्यांमुळे शाळकरी मुलांच्या बसेस,रुग्णवाहिका आणि कामगार तासन्तास ट्रॅफिकमध्ये अडकून पडत आहेत.सुपा रस्ता जोपर्यंत २२ मीटर रुंद होत नाही आणि महामार्ग अतिक्रमणमुक्त होत नाही,तोपर्यंत मनसे शांत बसणार नाही.यानंतर रस्त्यावर होणाऱ्या कोणत्याही अपघातास व जीवितहानीस प्रशासनच पूर्णपणे जबाबदार राहील.मागण्या मान्य न झाल्यास तीव्र मनसे स्टाईल जनआंदोलनाचा सामना करावा लागेल असे मनसे तालुकाप्रमुख अविनाश पवार यांनी सांगितले.निवेदन देतेवेळी सुपा शहराध्यक्ष अक्षय सूर्यवंशी,पारनेर शहराध्यक्ष सतीश म्हस्के, तालुका उपाध्यक्ष वीरेंद्र थोरात यांच्यासह मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.आता या इशाऱ्यानंतर सुस्त सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महसूल प्रशासन कधी जागे होते,याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
