‘त्या’ दोन्ही पोलिसांवर गुन्हे दाखल करून निलंबित करा अन्यथा आत्मदहन..पोलिसांच्या अत्याचारा विरोधात पीडित महिलेचा थेट इशारा..!
अहिल्यानगर/संगमनेर:-रक्षकांचा भक्षक बनलेला संगमनेर पोलिसांचा एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक चेहरा समोर आला आहे! एका साध्या,निष्पाप कुटुंबाला केवळ वाहतूक कोंडीत अडकल्यामुळे भररस्त्यात बेदम मारहाण करत महिलेला अश्लील शिवीगाळ केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.या प्रकरणी पोलीस कर्मचारी आगलावे आणि पोलीस उपनिरीक्षक सावंत यांच्यावर थेट गुन्हे दाखल करून निलंबनाची मागणी करण्यात आली आहे. “कारवाई झाली नाही,तर एसपी कार्यालयासमोर स्वतःला पेटवून घेईन!” असा निर्वाणीचा इशारा पीडित महिलेने दिल्याने पोलीस वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.अवघ्या ३.५ वर्षांच्या आजारी मुलाचा एक्स-रे काढण्यासाठी पीडित दांपत्य दवाखान्यात निघाले होते.
रस्त्यावर उपमुख्यमंत्र्यांचा ताफा येणार असल्याने मोठी गर्दी जमली होती.आजारी मुलाला घेऊन जात असताना कर्तव्यावर असलेला पोलीस कर्मचारी आगलावे (जे गणवेशातही नव्हते) त्यांनी गाडी अडवून चावी काढून घेतली.कसलीही चूक नसताना पतीची गचंडी पकडून कानामागे जोरदार मारहाण केली आणि महिलेकडे पाहत अत्यंत किळसवाणे,अश्लील हावभाव करत शिवीगाळ केली.धक्कादायक बाब म्हणजे,आगलावे याच्यावर यापूर्वीही अकोले येथे एका महिलेशी गैरवर्तन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल असल्याचा खळबळजनक आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.पतीला जबरदस्तीने ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात डांबले गेले.मागे एकटी पडलेली आई भर उन्हात आपल्या ३.५ वर्षांच्या आजारी बाळाला कडेवर घेऊन दिल्ली नाक्यावरून पोलीस ठाण्यापर्यंत रडत-धावत गेली.मात्र,पोलीस ठाण्यात पोहोचलेल्या त्या महिलेला पीएसआय सावंत यांनी थेट हाकलून लावले.
अत्यंत खालच्या पातळीवर दमदाटी: “तुझ्या नवऱ्याचे असे हाल करतो की आयुष्यभर लक्षात ठेवेल,तुमची लायकी नाही!” अशा धमक्या सावंत यांनी दिल्या.पीडित पतीच्या कंपनी मॅनेजरचा फोन नंबर शोधून पीएसआयने थेट मॅनेजरला फोन केला आणि “तुम्ही अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना नोकरीवर का ठेवता?” असे म्हणत नोकरी घालवण्याचीही खुली धमकी दिली.पीडित कुटुंबाची मारहाणीची साधी फिर्याद घेण्यास नकार दिला आणि “कुणाकडे जायचे तिकडे जा,आम्हाला काही फरक पडत नाही!” असे सांगत उलट निष्पाप कुटुंबावरच खोटे गुन्हे दाखल केले.या प्रचंड अन्यायाविरुद्ध पीडित महिलेने सर्व अधिकृत वैद्यकीय कागदपत्रांसह जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार केली आहे.आगलावे आणि सावंत या दोन्ही पोलिसांवर तात्काळ विनयभंग व मारहाणीचे गुन्हे दाखल करून त्यांना सेवेतून निलंबित करा! जर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या पोलिसांना पाठीशी घातले,तर कार्यालयासमोर आत्मदहन करण्याशिवाय माझ्याकडे पर्याय उरणार नाही.माझ्या आत्म्याला होणाऱ्या यातना आणि मृत्यूची सर्वस्वी जबाबदारी पोलीस प्रशासनाचीच राहील!आता या पोलिसांवर जिल्हा पोलीस अधीक्षक काय कारवाई करतात,याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
