२ कोटींच्या कर्जावर तब्बल १८ कोटींचे व्याज..!नगरमध्ये ७७ वर्षीय वृद्धाची जमीन लाटणाऱ्या कुख्यात सावकारांच्या एलसीबीने आवळल्या मुसक्या…
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-दोन कोटींचे कर्ज फेडण्यासाठी तब्बल पावणेचार कोटी रुपये देऊनही सावकारांची भूक भागली नाही.थेट १८ कोटी ३८ लाखांची अवाजवी मागणी करत वृद्धाची जमीन हडपणाऱ्या दोन बड्या अवैध सावकारांना स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. या धक्कादायक कारवाईमुळे शहरातील अवैध सावकारी जगतात प्रचंड खळबळ उडाली आहे.अहिल्यानगर येथील रेल्वे स्टेशन परिसरातील आगरकर मळा येथे राहणारे ७७ वर्षीय दत्तात्रय जगन्नाथ आगरकर यांनी सन २०१६ पासून गरजेपोटी आपली जमीन तारण ठेवून सुरेश मोतीलाल कांकरिया याच्याकडून वेळोवेळी २ कोटी रुपये व्याजाने घेतले होते.आगरकर यांनी मुद्दल आणि व्याजापोटी आजवर तब्बल ३ कोटी ७५ लाख रुपये आरोपींना परत केले.मात्र,एवढी मोठी रक्कम दिल्यानंतरही सावकारांची हाव संपली नाही.सुरेश कांकरिया आणि विनय होनराव यांनी संगनमत करून आगरकर यांची तारण ठेवलेली जमीन परत न करता त्यावर कब्जा करण्याचा प्रयत्न केला.एवढेच नव्हे,तर बेकायदेशीरपणे व्याजावर चक्रवाढ व्याज लावून आगरकर यांच्याकडे चक्क १८ कोटी ३८ लाख १४ हजार ६९५ रुपयांची अवाजवी मागणी सुरू केली.
ही रक्कम न दिल्यास जमीन बळकावण्याची धमकी देत वृद्धाला प्रचंड मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली.या छळाला कंटाळून अखेर दत्तात्रय आगरकर यांनी पोलिसांत धाव घेतली.त्यांच्या तक्रारीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) आणि महाराष्ट्र सावकारी अधिनियमातील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) तातडीने कारवाईचे आदेश दिले.त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार संदीप पवार,विजय ठोंबरे,सतीश भवर आणि महिला पोलीस अंमलदार किरण ठुबे यांच्या पथकाने तारकपूर परिसरात सापळा रचला.पोलिसांनी शिताफीने कारवाई करत सुरेश मोतीलाल कांकरिया (वय ६४,रा.विराज कॉलनी,तारकपूर बस स्टँडसमोर,अहिल्यानगर),विनय गुरूलिंग होनराव (वय ५५, रा. घर नं. २०३३, होनराव वाडा,डावरे गल्ली, अहिल्यानगर) या दोन मुख्य आरोपींना जेरबंद केले.ताब्यात घेतलेल्या दोन्ही आरोपींना पुढील कायदेशीर तपासासाठी तोफखाना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून,या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा हात आहे का,याचा कसून तपास पोलीस करत आहेत.
