‘जिओ’चा पेट्रोल पंप मिळवून देण्याच्या नावाखाली तब्बल ८४ लाखांचा गंडा;थेट उत्तर प्रदेशातून भामट्यांना उचलले सायबर पोलिसांची थरारक कामगिरी..!
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-‘जिओ’ कंपनीची अधिकृत पेट्रोल पंप डीलरशिप आणि परवाना मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका नागरिकाला तब्बल ८४ लाख ५३ हजार रुपयांचा गंडा घालणाऱ्या आंतरराज्यीय सायबर टोळीचा अहिल्यानगर सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांचा माग काढत थेट उत्तर प्रदेश गाठून पोलिसांनी अत्यंत शिताफीने दोन महाठगांच्या मुसक्या आवळल्या आहेत.दि.३१/१०/२०२५ ते दि.०८/०७/२०२६ या कालावधीत सायबर भामट्यांनी तक्रारदाराशी संपर्क साधला.मोबाईल क्रमांक ८३८२०१११८६ धारक (स्वतःचे नाव ‘सौरभ अग्रवाल’ सांगणारा) याने तक्रारदारास “जिओ कंपनीची पेट्रोलपंप डीलरशिप व परवाना मिळवून देतो” असे मोठे आमिष दाखवले.त्यानंतर प्रोसेसिंग फी व इतर विविध प्रशासकीय कारणांची बतावणी करून तक्रारदाराकडून वेळोवेळी तब्बल ८४,५३,०००/- रुपये (चौऱ्यांशी लाख त्रेपन्न हजार रुपये) विविध बँक खात्यांवर उकळले.आपली मोठी फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदाराने सायबर पोलिसांकडे धाव घेतली.त्यानुसार मोबाईल क्र. ८३८२०१११८६ धारक सौरभ अग्रवाल,मोबाईल क्र. ८३१८५९९७६७ धारक शिंदे इंजिनिअर व संबंधित बँक खातेधारकांविरुद्ध सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर २६/२०२६ अन्वये BNS कलम ३१८(४), ३१९(२) सह माहिती तंत्रज्ञान कायदा (IT Act) कलम ६६(D) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.गुन्ह्याचा तपास करत असताना तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक सागर ढिकले यांनी तांत्रिक विश्लेषण केले.
मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे संशयित आरोपी हे उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यात बनावट नावाने भाड्याने खोली घेऊन लपून बसल्याचे निष्पन्न झाले.पोलिसांनी तेथे अत्यंत कौशल्याने सापळा रचून आकाश सिंग पुत्र पुरण सिंह (वय २३ वर्षे,रा. इमेलिया,थाना मुस्करा, तहसील मौदहा,जि.हमीरपूर, राज्य उत्तरप्रदेश) (टोपणनाव: सौरभ अग्रवाल),निलेश कुमार द्विवेदी पुत्र सुरेश द्विवेदी (वय २९ वर्षे,रा.न्युरिया,थाना बिवार,तहसील मौदहा,जि. हमीरपूर, राज्य उत्तरप्रदेश) या दोन्ही सायबर ठगांना मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले.पोलिसांच्या प्राथमिक तपासात धक्कादायक माहिती समोर आली असून हे दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. यापूर्वी पंजाब आणि गुजरात या राज्यांतही अशाच प्रकारच्या कोट्यवधींच्या फसवणुकीचे गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत.या आंतरराज्यीय रॅकेटचे धागेदोरे आणखी कुठे पसरले आहेत,याचा तपास करण्यासाठी आरोपींना न्यायालयात पोलीस कोठडी (रिमांड) कामी हजर करण्यात येत आहे.
ही उल्लेखनिय कामगिरी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन,अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबुर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सागर.एस. ढिकले,पोउपनि.सुदाम काकडे,पोहेकॉ.उमेश खेडकर, पोहेकॉ.रावसाहेब हुसळे, पोहेकॉ शैलेश गोमसाळे, पोहेकॉ.रविंद्र कर्डिले,पोहेकॉ. प्रशांत जाधव,पोकॉ आप्पा हिंगे आणि पोकॉप्रशांत राठोड यांनी केली आहे.
