त्या गुप्त अड्ड्यांवर एलसीबीची धाड;हजारो लिटर रसायन जागीच खाक..११ आरोपींवर कारवाईचा बडगा..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-नेप्ती गावाच्या हद्दीत एकाच वेळी पाच वेगवेगळ्या ठिकाणी काहीतरी संशयास्पद हालचाली सुरू होत्या.सामान्य नागरिकांना कल्पनाही नव्हती की गावाच्या आडून कसला काळा कारभार चालवला जात आहे.मात्र, पोलिसांच्या गुप्त खबऱ्यांना याचा सुगावा लागला आणि पुढच्या काही तासांत जे घडलं, त्याने अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) एका मोठ्या फौजफाट्याने नेप्ती गावात अचानक गुप्त ‘ऑपरेशन’ राबवून ५ वेगवेगळ्या हातभट्टी अड्ड्यांवर एकाच वेळी छापे टाकले.
या कारवाईत पोलिसांनी तब्बल ६,५०० लिटर कच्चे रसायन आणि ४१० लिटर तयार गावठी दारू असा एकूण ३ लाख ६३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जागीच उद्ध्वस्त केला.जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिलेल्या कडक आदेशांनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथके तयार करण्यात आली होती.या पथकांनी ९ सप्टेंबर रोजी नेप्ती परिसराची नाकेबंदी करत धडक कारवाई केली.या कारवाईत पोलिसांनी पाच गुन्हे नोंदवून ११ आरोपींवर कारवाईचा बडगा उचलला आहे.
पहिली कारवाई: मराठी शाळेजवळ अजय चांगदेव पवार (वय २७) याला ताब्यात घेण्यात आले,तर शशीकला पवार ही फरार झाली.येथे ७०० लिटर रसायन व ६० लिटर दारू नष्ट करण्यात आली.
दुसरी कारवाई: सुनील बाजीराव पवार (वय ४३) याच्या अड्ड्यावर छापा टाकून २,२०० लिटर रसायन आणि ७० लिटर दारू जप्त करण्यात आली;साथीदार राजू पवार फरार झाला.
तिसरी कारवाई:दीपक बबन नागपूरे (वय ४७) याला रंगेहात पकडण्यात आले, तर लहानुबाई पवार पसार झाली. येथे १,२०० लिटर रसायन नष्ट करण्यात आले.
चौथी कारवाई:भारत माणिक पवार (वय ४३) याच्याकडून तब्बल २,००० लिटर कच्चे रसायन व २०० लिटर दारू जप्त झाली; मंगल पवार ही महिला आरोपी फरार झाली.
पाचवी कारवाई: शरद माणिक पवार (वय ४०) याच्या अड्ड्यावरून ४०० लिटर रसायन जप्त करण्यात आले; तर ज्योती पवार आणि कमल पवार या दोन महिला आरोपी फरार झाल्या.
ही धडक कामगिरी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे,सहायक पोलीस निरीक्षक हरीष भोये, पोलीस उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड तसेच पोलीस अंमलदार संदीप पवार,बिरप्पा करमल, भीमराज खर्से,संतोष खैरे,शाहीद शेख,अतुल लोटके, अभिजीत अरकल,विजय ठोंबरे,विकास साळवे,अशोक लिपणे,शामसुंदर जाधव,अमोल आजबे,सतीश भवर, रोहित मिसाळ,प्रताप देवकाते आणि महिला पोलीस अंमलदार सुनिता पवार, सोनल भागवत,ज्योती शिंदे, भाग्यश्री भिटे,किरण ठुबे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.पोलिसांच्या या अचानक झालेल्या कारवाईमुळे नेप्ती परिसरासह तालुक्यातील अवैध धंदेवाल्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
