निमगाव शाळेत ‘गुरु’ झाले विद्यार्थी;शिक्षकांचा ग्रामस्थांतर्फे सन्मान!चौथीच्या विद्यार्थ्यांनी सांभाळली शिक्षकांची जबाबदारी;शिक्षकांप्रती व्यक्त केली कृतज्ञता
श्रीरामपूर (वार्ताहर):-तालुक्यातील निमगाव खैरी गावातील जि.प.प्रा.शाळा,निमगाव येथे शिक्षक दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी भारताचे माजी राष्ट्रपती व थोर शिक्षणतज्ज्ञ डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.शिक्षक दिनाचे औचित्य साधून इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी एक दिवस शिक्षकाची भूमिका पार पाडली.विद्यार्थ्यांनी सकाळपासून रांगोळी काढणे,परिपाठ घेणे,वर्गात प्रत्यक्ष अध्यापन करणे,मुख्याध्यापक, शिक्षक,शिपाई या भूमिका तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदी जबाबदाऱ्या उत्स्फूर्तपणे पार पाडल्या. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.विद्यार्थी,माजी विद्यार्थी संघ व शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने शाळेचे मुख्याध्यापक संतोष वाघमोडे तसेच शिक्षिका प्रतिभा तोरणे,मीना निकम व सुधा गमे यांचा सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षिका प्रतिभा तोरणे होत्या.अध्यक्षीय सूचना विद्यार्थिनी पायल धुळगंड हिने मांडली,तर श्रेया तरस हिने अनुमोदन दिले.सूत्रसंचालन अंकिता बत्तीसे हिने केले.
यावेळी पायल धुळगंड,श्रेया तरस,गौरी धुळगंड,धनुष साबळे,विश्वजीत कालंगडे,आराध्या पवार व आराध्या धुळगंड यांनी मनोगतातून शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.विश्वजीत कालंगडे या विद्यार्थ्यांने मुख्याध्यापकाची भूमिका बजावली.शिक्षक दिनानिमित्त घेण्यात आलेल्या प्रश्नमंजुषा स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना पेन देऊन गौरविण्यात आले.विद्यार्थ्यांनीही आपल्या शिक्षकांना पेन, गुलाबपुष्प व श्रीफळ देऊन सन्मानित केले.निमगाव खैरी ग्रामस्थांच्या वतीने शिक्षकांचा विशेष सन्मान करण्यात आला.माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष विलास शेजुळ,दादासाहेब शेजुळ तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश तरस,उपाध्यक्षा सोनाली साबळे, महेंद्र साबळे व समितीच्या सदस्या पूजा कालंगडे,चैताली तरस,अर्चना भागडे,जयश्री भागडे,राजश्री भागडे,अर्चना जिवरख,पूजा धुळगंड ,छाया धुळगंड,सोनाली रणनवरे,जयश्री परदेशी,अश्विनी पवार,पुनम वाघ,उत्तम भागडे
यांच्या वतीने शिक्षकांना विठ्ठल-रुख्मिणीची सुंदर मूर्ती व पेन देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी विलास शेजुळ व पूजा कालंगडे यांनी शाळेतील शिक्षकांच्या कार्याचा गौरव करत शाळेची होत असलेली शैक्षणिक प्रगती कौतुकास्पद असल्याचे नमूद केले.मुख्याध्यापक संतोष वाघमोडे तसेच सर्व शिक्षकांनी मनोगतातून उपस्थितांचे आभार मानले. विद्यार्थ्यांची शैक्षणिक व सर्वांगीण प्रगती साधण्यासाठी सर्व शिक्षक कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.कार्यक्रमास ग्रामस्थ,पालक व माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.शिक्षक दिनानिमित्त राबविण्यात आलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्व ग्रामस्थांनी कौतुक व अभिनंदन केले.
