अहिल्यानगर पोलिसांचा गुन्हेगारी जगताला जबरी दणका:१,२०२ गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई;५.११ कोटींचा अवैध मुद्देमाल जप्त..!
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलाने गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी आणि अवैध धंद्यांचे कंबरडे मोडण्यासाठी ऑगस्ट महिन्यात अत्यंत आक्रमक मोहीम राबवली.पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आलेल्या या व्यापक मोहिमेत तब्बल १,२०२ सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून,अवैध धंद्यांवर टाकलेल्या छाप्यांमध्ये तब्बल ५ कोटी ११ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.पोलिसांच्या या ‘ऑल आऊट’ ॲक्शनमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारी जगतात प्रचंड खळबळ उडाली आहे.जिल्हाभरात अवैध धंद्यांची पाळेमुळे खणून काढताना पोलिसांनी एकाच महिन्यात ५९० कारवाया करून ६९४ आरोपींना बेड्या ठोकल्या.यामध्ये तब्बल ५ कोटी ११ लाख ५९ हजार १७२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.यात जप्त शस्त्रे..७ गावठी कट्टे, ९ जिवंत काडतुसे आणि १५ तलवारी व कोयते.
कारवायांचा तपशील: दारूबंदी अंतर्गत २९८, जुगारावर ११६, मावा-गुटखा-सुगंधी तंबाखूवर ८१, गोमांस तस्करीवर ५४, अवैध वाळू उपशावर २३ आणि प्राणघातक शस्त्रांविरोधात १८ गुन्हे नोंदवण्यात आले.१०६ गुन्हे उघडकीस;२.३४ कोटींचा ऐवज हस्तगत करण्यात आला.
ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात दाखल गुन्ह्यांपैकी पोलिसांनी मालाविरुद्धच्या तब्बल १०६ गंभीर गुन्ह्यांची उकल केली. यामध्ये दरोडा (२), जबरी चोरी (१८), घरफोडी (७) आणि चोरीच्या (७६) गुन्ह्यांचा समावेश आहे.या कारवायांमध्ये ९३ आरोपींना अटक करून त्यांच्याकडून २ कोटी ३४ लाख ३८ हजार २१९ रुपयांचा चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.‘ऑपरेशन मुस्कान’मधून ९१ जणांना दिला जीवदान अपहृत आणि बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यासाठी राबवण्यात आलेल्या ‘ऑपरेशन मुस्कान’ अंतर्गत अहिल्यानगर पोलिसांनी उल्लेखनीय यश मिळवले.अपहरणाच्या गुन्ह्यांतील १३ मुली व २ मुले, तसेच बेपत्ता (मिसिंग) असलेल्या ४९ महिला व २७ पुरुष अशा एकूण ९१ व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना सुखरूप नातेवाईकांच्या स्वाधीन केले.‘नशामुक्त अहिल्यानगर’साठी कडक मोहीम जिल्हा व्यसनमुक्त करण्याच्या उद्देशाने जनजागृती रॅली, स्टॉल्स आणि प्रबोधन मोहिमा राबवण्यात आल्या. यासोबतच अंमली पदार्थ बाळगणाऱ्या ९ आरोपींविरोधात एनडीपीएस कायद्यानुसार ४ गुन्हे नोंदवून ८ लाख ३ हजार रुपयांचा अमली साठा जप्त केला; तर सेवन करणाऱ्यांविरुद्ध ११ गुन्हे दाखल केले.सायबर सेलची तत्परता: १२ लाख परत, ३५ मोबाईल शोधले नागरिकांची ऑनलाइन फसवणूक रोखण्यासाठी सायबर पोलीस ठाण्याने युद्धपातळीवर काम केले.११ लाख ९७ हजार ९८६ रुपये नागरिकांच्या खात्यात परत मिळवून दिले.
‘CEIR’ पोर्टलच्या मदतीने ३५ चोरीस गेलेले मोबाईल शोधून मूळ मालकांना परत केले.समन्वय पोर्टलवरील ३७१ नोटिसांवर तातडीने अंमलबजावणी केली.वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना १.३७ कोटींचा दंड
महामार्ग आणि प्रमुख चौकांमध्ये शिस्त लावण्यासाठी वाहतूक पोलिसांनी भरधाव वेग, ट्रिपल सीट, फॅन्सी नंबर प्लेट आणि मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर करडी नजर ठेवली. महिनाभरात १६,९८० केसेस दाखल करून तब्बल १ कोटी ३७ लाख ७० हजार २०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन,अपर पोलीस अधीक्षक (अहिल्यानगर) वैभव कलुबर्मे आणि अपर पोलीस अधीक्षक (श्रीरामपूर) सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी,स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि वाहतूक शाखेच्या अंमलदारांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
