प्लॉट खरेदीची नोंद ऑनलाइन अडकवून ५ हजारांची ‘मागणी’;१ हजार उकळले खरे,पण उर्वरित हप्त्याची वाट पाहताना मंडळ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-संगणकीय सातबारा उताऱ्यावर खरेदी केलेल्या प्लॉटची ऑनलाइन नोंद करण्यासाठी ५,००० हजार रुपयांची लाच मागून त्यातील १,००० रुपये आधीच स्वीकारणाऱ्या कापूरवाडीच्या महिला मंडळ अधिकारी संगीता नारायण पुंड (वय ३७) यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) धडक कारवाई केली आहे.उर्वरित ४,००० रुपयांची मागणी पडताळणीत निष्पन्न झाल्यानंतर त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली असून,भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तक्रारदार (वय ५८, व्यवसाय:चालक) आणि त्यांच्या मित्राने मौजे बुऱ्हाणनगर (ता.जि. अहिल्यानगर) येथील गट नं. ०६, प्लॉट नं. ४९ मधील २१०.९० चौ. मी. क्षेत्र खरेदी केले होते.या खरेदीची नोंद जुन्या फेरफार क्र. ६८०२ अन्वये सातबारा उताऱ्यावर झाली होती.मात्र,संगणकीकृत सातबारा तयार करताना ही नोंद ऑनलाइन प्रणालीवर कार्यान्वित झाली नव्हती.सदर नोंद ऑनलाइन सातबाऱ्यावर अपडेट करून मिळावी यासाठी तक्रारदारांनी ८ डिसेंबर २०२५ रोजी तहसीलदारांकडे अर्ज केला होता.
या अर्जाच्या चौकशीचे काम कापूरवाडीच्या मंडळ अधिकारी संगीता पुंड यांच्याकडे सोपवण्यात आले होते.२४ जुलै २०२६ रोजी तक्रारदाराने मंडळ अधिकारी कार्यालयात संगीता पुंड यांची भेट घेतली असता,त्यांनी ऑनलाइन सातबारा रन करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ५,००० रुपयांच्या लाचेची मागणी केली.त्या वेळी तक्रारदाराने पुंड यांना १,००० रुपये दिले.मात्र,उर्वरित ४,००० रुपयांसाठी पुंड यांनी तगादा लावल्याने तक्रारदाराने अखेर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) रीतसर तक्रार नोंदवली.तक्रारीच्या आधारे २७ जुलै २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कापूरवाडी मंडळ अधिकारी कार्यालयात पंचांसमक्ष लाच मागणीची पडताळणी केली.या पडताळणीत संगीता पुंड यांनी पूर्वी स्वीकारलेल्या १,००० रुपयांना दुजोरा देत उर्वरित ४,००० रुपयांच्या लाचेची उघड मागणी केली इतकेच नव्हे तर,तहसील कार्यालयातील संबंधित मॅडमशी बोलून त्यांच्याशी भेट घालून देतो असे सांगत त्यांनाही लाच देण्यास प्रोत्साहन दिल्याचे पडताळणी दरम्यान निष्पन्न झाले.लाच मागणी सिद्ध झाल्यानंतर आज,दि.०८ सप्टेंबर २०२६ रोजी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात संगीता नारायण पुंड यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ च्या कलम ७ आणि १२ अन्वये गुन्हा (गु.र.नं. ४६२/२०२६) दाखल करण्यात आला. सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे,अप्पर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे आणि कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर एसीबीचे पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या पर्यवेक्षणात पोलीस निरीक्षक छाया देवरे,पोलीस अंमलदार गजानन गायकवाड,सचिन सुद्रुक आणि सुपेकर यांच्या पथकाने केली.
