सामाजिक कार्यकर्त्या नंदाताई विभुते यांची मलकापूर नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीवर निवड नगरपालिकेतर्फे भव्य सत्कार
कराड/मलकापूर (विशेष प्रतिनिधी-विजया माने):-मलकापूर येथील प्रभाग क्रमांक १० मधील सामाजिक कार्यकर्त्या नंदाताई विभुते यांची मलकापूर नगरपालिके कडून महिला व बालकल्याण समितीच्या सदस्यपदी निवड झाली आहे.त्यांच्या या निवडीने मलकापूर शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून,मलकापूर नगरपालिकेच्या वतीने त्यांचा यथोचित व स्नेहपूर्वक नागरी सत्कार करण्यात आला.नंदाताई विभुते या प्रभाग क्रमांक १० सह मलकापूर परिसरामध्ये सामाजिक कार्यात सतत सक्रिय असतात.
महिलांचे सबलीकरण,कौटुंबिक स्वास्थ्य,बचत गटांचे बळकटीकरण आणि बालकांच्या विकासाशी निगडित विविध उपक्रमांत त्यांचा सातत्याने सहभाग राहिला आहे.सर्वसामान्य महिलांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी त्या नेहमीच अग्रेसर असतात.त्यांच्या याच समाजोपयोगी कार्याची आणि निष्ठेची दखल घेत सातारा जिल्हा महिला व बालकल्याण समितीच्या सदस्यपदी त्यांची महत्त्वपूर्ण निवड करण्यात आली आहे.विभुते यांच्या निवडीचे वृत्त समजताच मलकापूर शहरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. मलकापूर नगरपालिकेत आयोजित विशेष कार्यक्रमात त्यांचा शाल,श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला.याप्रसंगी नगरपालिकेचे नगराध्यक्ष,उपनगराध्यक्ष तसेच सर्व सन्माननीय नगरसेवक व नगरसेविकांनी विभुते यांचे मनापासून अभिनंदन केले. नंदाताई या पदाच्या माध्यमातून जिल्हाभरात महिला व बालकांच्या हितासाठी अधिक सक्षमपणे आणि प्रभावीपणे काम करतील,” असा विश्वास मान्यवरांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला.
मलकापूर नगरपालिका जिल्हा महिला व बालकल्याण समितीवर झालेली निवड ही माझ्यासाठी समाजाची सेवा करण्याची नवी व मोठी संधी आहे. तळागाळातील महिलांचे सक्षमीकरण करणे, बालकांच्या आरोग्य आणि शिक्षणाचे प्रश्न मार्गी लावणे याला माझे प्राधान्य राहील. मलकापूर नगरपालिकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष,सर्व सदस्य आणि परिसरातील नागरिकांनी दाखवलेल्या या विश्वासाबद्दल मी सर्वांची मनःपूर्वक ऋणी आहे.असे नूतन सदस्य,मलकापूर नगरपालिका महिला व बालकल्याण समिती नंदाताई विभुते यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.विभुते यांच्या निवडीबद्दल मलकापूर व कराड परिसरातील विविध महिला मंडळे,सामाजिक संस्था, बचत गट आणि प्रतिष्ठित नागरिकांनी त्यांचे प्रत्यक्ष भेटून व दूरध्वनीवरून अभिनंदन केले.प्रभाग क्रमांक १० मधील रहिवाशांनी या निवडीबद्दल आनंद व्यक्त करत त्यांच्या पुढील सामाजिक वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या.
