मायेची राखी अन् आठवणींची साद:स्नेहालयात ५० हून अधिक माजी विद्यार्थ्यांचा डोळे पाणावणारा ‘स्नेहबंध’ रक्षाबंधन सोहळा..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-रक्ताच्या नात्यापलीकडे जाऊन हृदयाशी जुळलेली नाती किती घट्ट असू शकतात,याचा अत्यंत भावूक आणि देखणा प्रत्यय रविवारी स्नेहालयात आला. स्नेहालय–स्नेहबंध प्रकल्पाच्या वतीने संस्थेतून बाहेर पडून स्वतःच्या पायावर उभे राहिलेल्या ५० ते ६० माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी रवींद्रनाथ टागोर हॉल येथे एका आगळ्यावेगळ्या रक्षाबंधन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.बालपणीच्या सुख-दुःखात सोबत राहिलेल्या बहिणींनी भावांच्या मनगटावर विश्वासाची राखी बांधली,तेव्हा हॉलमधील वातावरण आपुलकी आणि मायेने ओथंबून गेले.कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने आणि सुश्राव्य स्वागतगीताने झाली.५ सप्टेंबर रोजी झालेल्या शिक्षक दिनाचे औचित्य साधून उपस्थित सर्व मान्यवर व मार्गदर्शकांचा पुष्पगुच्छ व विशेष भेटवस्तू देऊन कृतज्ञतापूर्वक सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन ‘एफबीसी’ प्रकल्पाच्या अपर्णा स्वामी व निशा घाडगे यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना स्नेहालय संस्थेचे समाधान धालगुडे यांनी स्नेहबंध प्रकल्पाची भूमिका विशद केली.”संस्थेतून बाहेर पडल्यानंतरही विद्यार्थी एकटे पडू नयेत;त्यांच्या उच्च शिक्षणात, रोजगारात, आरोग्याच्या प्रश्नात आणि विवाहासारख्या महत्त्वाच्या टप्प्यांवर संस्था खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभी राहते,” अशी माहिती त्यांनी दिली.
या सोहळ्यासाठी यूके स्नेहालयचे विश्वस्त निक कॉक्स विशेषत्वाने उपस्थित होते.५० हून अधिक माजी विद्यार्थी केवळ स्नेह आणि नात्याच्या ओढीने एका छताखाली आल्याचे पाहून त्यांनी मनापासून आनंद व्यक्त केला. स्नेहालयाने दिलेले संस्कार आणि जोडलेली माणसे हीच या संस्थेची खरी ताकद असल्याचे त्यांनी नमूद केले.स्नेहालय संस्थेचे कार्याध्यक्ष अनिल गावडे यांनी उपस्थित तरुणाईला कुटुंबव्यवस्थेचे महत्त्व पटवून दिले.ते म्हणाले, “संस्थेतून बाहेर पडल्यानंतर प्रत्येकाने एक जबाबदार नागरिक म्हणून जगावे. एकमेकांच्या सुख-दुःखात धावून जाणे हीच स्नेहालयाची खरी शिकवण आहे.” यावेळी त्यांनी पुणे येथील माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन आपल्या आजारी सहकाऱ्याच्या उपचारासाठी मोठा निधी उभारून केलेल्या मदतीचा गौरवपूर्ण दाखला दिला.स्नेहबंध प्रकल्पाचे श्री. प्रवीण राठोड यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “हा केवळ राखीचा धागा बांधण्याचा सोहळा नसून, बालपणी एकत्र खेळलेल्या-शिकलेल्या भाऊ-बहिणींना पुन्हा एकत्र आणून त्यांच्यातील आत्मियता अधिक घट्ट करणारा मायेचा दुवा आहे.”
“स्नेहालयच्या दारात पाऊल ठेवले की आजही माहेरी आल्यासारखे वाटते.आम्ही बाहेर पडलो तरी संस्था आणि आमची ही भावंडे कधीच दुरावली नाहीत.आज हातावर बांधलेली ही राखी आम्हाला आयुष्यभर एकमेकांची ढाल बनून राहण्याची ताकद देते अशी भाऊक प्रतिक्रिया
माजी विद्यार्थ्यांनी दिली.भावनिक सोहळ्यानंतर माजी विद्यार्थी मनोज अहिरे यांनी सर्व उपस्थितांसाठी दोन अत्यंत मनोरंजक खेळांचे आयोजन केले.बालपणीच्या खोड्या आणि खेळांच्या आठवणीत सर्वजण रमून गेले. यानंतर सर्वांनी गरमागरम समोसे,जिलेबी आणि चहाच्या अल्पोपहाराचा आस्वाद घेत गप्पांची मैफल रंगवली.या आगळ्यावेगळ्या सोहळ्याला स्नेहालय संस्थेचे ज्ञानेश्वर वाघ,एफबीसी प्रकल्पाचे सागर भिंगारदिवे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्नेहबंध प्रकल्पाच्या रेखा पाथरकर, पूजा गायकवाड व अनिता गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले.शेवटी प्रवीण राठोड यांनी उपस्थितांचे आभार मानले.
