गतिमान व पारदर्शक कारभाराची पोचपावती..डोळासणेचे मंडळ अधिकारी ज्ञानेश्वर बेल्हेकर जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मानित..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-प्रशासकीय कामकाजात तत्परता, पारदर्शकता आणि कर्तव्यनिष्ठा दाखवत गुंतागुंतीचे व वादग्रस्त फेरफार वेळेत निकाली काढणारे संगमनेर तालुक्यातील डोळासणे मंडळाचे मंडळ अधिकारी ज्ञानेश्वर बेल्हेकर यांना जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी डॉ.पंकज आशिया यांच्या हस्ते विशेष प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.महसूल दिनाचे औचित्य साधून त्यांच्या या उत्कृष्ट व लोकाभिमुख कार्याचा गौरव करण्यात आला आहे.
मंडळ अधिकारी ज्ञानेश्वर बेल्हेकर यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील नोंदणीकृत,अनोंदणीकृत तसेच अत्यंत गुंतागुंतीचे आणि वादग्रस्त फेरफार विहित कालमर्यादेत व अत्यंत जलद गतीने निकाली काढण्याचे उल्लेखनीय कार्य केले आहे. वादग्रस्त फेरफार प्रकरणांमध्ये कायद्याच्या चौकटीत राहून, दोन्ही बाजूंची निष्पक्ष सुनावणी घेत त्यांनी अनेक वर्षांचे प्रलंबित प्रश्न कौशल्याने सोडवले.फेरफार नोंदी सातत्याने अद्ययावत ठेवल्यामुळे सर्वसामान्य नागरिक,शेतकरी व खातेदारांना महसूल सेवा वेळेत मिळण्यास मोठी मदत झाली.त्यांच्या या गतिमान आणि शेतकरीभिमुख प्रशासकीय सेवेची दखल घेत जिल्हा प्रशासनातर्फे त्यांना सन्मानपत्र प्रदान करण्यात आले असून,त्यांच्या पुढील प्रशासकीय व सामाजिक वाटचालीस जिल्हाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.या सन्मानाबद्दल महसूल वर्तुळातून तसेच डोळासणे व संगमनेर परिसरातील शेतकरी आणि नागरिकांमधून बेल्हेकर यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
