संविधानावर घाला खपवून घेणार नाही..! उपवर्गीकरणाविरोधात अहिल्यानगरात पेटणार जनआक्रोश ६ ऑक्टोबरला महामोर्चा,आनंदराज आंबेडकरांचा विधानभवनाला घेरावाचा थेट इशारा
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-अनुसूचित जातींच्या हक्कांवर आणि मूळ आरक्षण चौकटीवर गदा आणणारा उपवर्गीकरणाचा निर्णय तातडीने मागे घ्या, अन्यथा या अन्यायाविरोधात रस्त्यावर उतरून संविधानाचा आवाज बुलंद करू,असा खणखणीत इशारा रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी दिला आहे.याच मुद्द्यावरून येत्या ६ ऑक्टोबर रोजी अहिल्यानगरच्या भूमीत ‘विराट संविधान बचाव मोर्चा’ धडकणार असून,आंबेडकरी जनतेच्या असंतोषाची ठिणगी आता वणवा पेटवण्याच्या तयारीत आहे.अहिल्यानगर शासकीय विश्रामगृह येथे आयोजित अत्यंत महत्त्वपूर्ण पत्रकार परिषदेत आनंदराज आंबेडकर यांनी सरकारवर जोरदार तोफ डागली.ते म्हणाले, “अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाचा घाट घालून शासन समाजघटकांमध्ये अंतर्गत दरी आणि जातीय संघर्षाचे वातावरण निर्माण करत आहे.आरक्षण संपवण्याचे हे अप्रत्यक्ष षड्यंत्र असून,घटनेच्या परिशिष्टातील यादीत फेरबदल करण्याचा मूळ अधिकार केवळ देशाच्या सार्वभौम संसदेला आहे. सरकारने हा मनमानी निर्णय रद्द केला नाही,तर आगामी हिवाळी अधिवेशनात विधानभवनाला थेट घेराव घालण्यात येईल.” विद्यार्थ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवरही त्यांनी सरकारला धारेवर धरत,सामाजिक न्यायाच्या रक्षणासाठी सर्व शोषित घटकांनी संघटित होण्याचे आवाहन केले.६ ऑक्टोबर रोजी निघणारा हा मोर्चा ऐतिहासिक ठरणार असून,जिल्ह्यातील विविध अनुसूचित जातींचे घटक,विविध सामाजिक संघटना, सेवानिवृत्त शासकीय कर्मचारी,युवक आणि संविधानप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.उपवर्गीकरणाचा निर्णय जोपर्यंत शासन मागे घेत नाही, तोपर्यंत हा लढा लोकशाही मार्गाने अधिक तीव्र करण्याचा निर्धार या वेळी व्यक्त करण्यात आला.
या पत्रकार परिषदेदरम्यान जनआंदोलनाची दिशा ठरवताना रिपब्लिकन चळवळीतील अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.यामध्ये प्रामुख्याने नगरसेवक सुरेश बनसोडे,सुमेध गायकवाड,किरण दाभाडे,निवृत्ती आरु,सिद्धार्थ आढाव,अमित काळे,गौतमी भिंगारदिवे,प्रा.जाधव एल.बी,विशाल कांबळे,विलास साठे,जयश्री गायकवाड,समीर भिंगारदिवे,अजिंक्य भिंगारदिवे,सुनील शिंदे,मृणाल भिंगारदिवे,शनेश्र्वर पवार,अजय पाखरे,निखिल सूर्यवंशी,महेश भोसले
यांच्यासह आंबेडकरी चळवळीतील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी नगरसेवक सुरेश भाऊ बनसोडे यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, “हा मोर्चा केवळ एका घटकाचा नसून, संविधानाने दिलेल्या स्वाभिमानाचा आणि अधिकारांचा लढा आहे. जिल्ह्यातील प्रत्येक स्वाभिमानी नागरिकाने ६ ऑक्टोबर रोजी रस्त्यावर उतरून या विराट मोर्चाला ताकद द्यावी.”
