प्रभाग क्र.१० च्या नगरसेविका नंदाताई विभुते यांची सातारा जिल्हा महिला व बालकल्याण समितीवर निवड मलकापूर नगरपालिकेतर्फे भव्य नागरी सत्कार..
कराड/मलकापूर (विशेष प्रतिनिधी-विजया माने):-मलकापूर नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १० मधील कार्यतत्पर व अभ्यासू नगरसेविका नंदाताई विभुते यांची सातारा जिल्हा महिला व बालकल्याण समितीच्या सदस्यपदी नुकतीच निवड झाली आहे.या निवडीने मलकापूर शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून,मलकापूर नगरपालिकेच्या वतीने त्यांचा यथोचित व स्नेहपूर्वक नागरी सत्कार करण्यात आला.नंदाताई विभुते यांनी प्रभाग क्रमांक १० मध्ये स्थानिक पातळीवर नागरी सुविधा,महिलांचे सबलीकरण आणि बालकांच्या आरोग्य व शिक्षणासाठी सातत्याने भरीव कामगिरी केली आहे.त्यांच्या याच जनसंपर्काची, अभ्यासूपणाची आणि कार्यक्षमतेची दखल घेऊन सातारा जिल्हा महिला व बालकल्याण समितीवर त्यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे महिला व बालकांच्या प्रश्नांना जिल्हा पातळीवर हक्काचा आवाज मिळाला आहे,अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.नंदाताई विभुते यांच्या निवडीचे वृत्त समजताच मलकापूर नगरपालिकेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले.पालिकेच्या मुख्य सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या विशेष सत्कार समारंभात त्यांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन उत्साहात स्वागत करण्यात आले.याप्रसंगी नगरपालिकेचे नगराध्यक्ष,उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी तसेच सर्व सन्माननीय नगरसेवक व नगरसेविकांनी विभुते यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
“नंदाताईंच्या निवडीमुळे मलकापूर नगरपालिकेचा नावलौकिक जिल्हास्तरावर वाढला असून,महिला व बालकांच्या विकासासाठी त्या या पदाच्या माध्यमातून अधिक ताकदीने काम करतील,” असा विश्वास मान्यवरांनी आपल्या शुभेच्छापर भाषणात व्यक्त केला.यावेळी नंदाताई विभूते म्हणाल्या की,सातारा जिल्हा महिला व बालकल्याण समितीवर काम करण्याची मिळालेली ही संधी म्हणजे मला जनतेच्या सेवेसाठी दिलेली नवी जबाबदारी आहे. महिलांचे सक्षमीकरण,बचत गटांना बळकटी आणि बालकांचे पोषण व शिक्षणाचा दर्जा सुधारणे याला माझे सर्वोच्च प्राधान्य असेल.मलकापूर पालिकेचे अध्यक्ष,उपाध्यक्ष,सर्व सहकारी सदस्य आणि माझ्या प्रभागातील नागरिकांनी दिलेल्या खंबीर साथीमुळेच मी इथपर्यंत पोहोचू शकले आहे.विभुते यांच्या निवडीनंतर मलकापूर,कराड शहर व परिसरातील विविध सामाजिक संस्था,महिला मंडळे,बचत गट आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून व दूरध्वनीवरून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. प्रभागातील नागरिकांनी फटाके फोडून व पेढे वाटून हा आनंदोत्सव साजरा केला.या निवडीमुळे मलकापूरच्या राजकीय व सामाजिक पटलावर महिला नेतृत्वाची पकड अधिक घट्ट झाल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.
