बाप-लेकाचा काळा धंदा स्थानिक गुन्हे शाखेची झडप २ किलोहून अधिक गांजासह २२ वर्षीय तरुण गजाआड.!
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-जिल्ह्यात अमली पदार्थांची पाळेमुळे उखडून फेकण्यासाठी पोलीस प्रशासनाने मोठी मोहीम उघडली आहे.पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या थेट आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि शेवगाव पोलिसांनी संयुक्तपणे शहर टाकळी येथे अत्यंत थरारक छापा टाकत चालणाऱ्या गांजा रॅकेटचा पर्दाफाश केला.या कारवाईत पोलिसांनी घरातून २ किलो १३० ग्रॅम गांजा, ८० चिलीम आणि इलेक्ट्रॉनिक वजनकाट्यासह लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.जिल्ह्यातील अमली पदार्थ तस्करांचा बंदोबस्त करण्यासाठी अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे नोडल अधिकारी तथा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक शेवगाव हद्दीत गस्त घालत होते.यावेळी शहर टाकळी (ता. शेवगाव) येथील सयाजी रंगनाथ कोल्हे हा स्वतःच्या राहत्या घरातून गांजा बाळगून त्याची खुलेआम विक्री करत असल्याची अत्यंत गोपनीय माहिती पथकाला मिळाली.माहितीची खातरजमा होताच पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या सूचनेनुसार शेवगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांना तत्काळ सतर्क करण्यात आले.
उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या मंजुरीनंतर LCB चे पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे,शेवगावचे पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांच्यासह अंमलदारांच्या पथकाने सरकारी वाहनातून थेट सयाजी कोल्हे याच्या घरावर छापा मारला.पोलिसांनी पंचांसमक्ष घराची कसून झडती घेतली असता,तिथे अंमली पदार्थांचा मोठा साठा पाहून पथकही सतर्क झाले.पोलिसांनी घटनास्थळावरून आरोपी संकेत सयाजी कोल्हे (वय २२) याला जागीच ताब्यात घेतले.त्याच्याकडून:६७,५०० रुपये किमतीचा २ किलो ७० ग्रॅम सुका गांजा १,५०० रुपयांचा प्लास्टिक पिशवीत भरलेला ६० ग्रॅम गांजा,१,६०० रुपये किमतीच्या तब्बल ८० चिलीम १,००० रुपये किमतीचा एक इलेक्ट्रॉनिक वजनकाटा
असा एकूण ७१ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.आरोपी संकेत कोल्हे याच्याकडे पोलिसी खाक्या दाखवत कसून चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली.तो आणि त्याचे वडील सयाजी रंगनाथ कोल्हे हे दोघे मिळून हा गांजा विक्रीचा व्यवसाय करत होते.हा गांजा त्यांनी पाथर्डी तालुक्यातील मोन्या कैलास पवार (रा. जिरेवाडी,कोरडगाव) याच्याकडून विकत आणल्याची कबुली त्याने दिली.या कारवाईची चाहूल लागताच संकेतचे वडील सयाजी कोल्हे आणि पुरवठादार मोन्या पवार हे दोघे फरार झाले असून,तिघांविरुद्ध शेवगाव पोलीस ठाण्यात एनडीपीएस (NDPS) कायद्यान्वये गुन्हा दाखल (गु.र.नं. ७१५/२०२६) करण्यात आला आहे.ही धाडसी कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. संतोष मुटकुळे,पोनि.मोहन बोरसे,पोउपनि.अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार बिरप्पा करमल,बाळासाहेब नागरगोजे,अशोक लिपणे,भगवान सानप,भगवान धुळे, महिला पोलीस अंमलदार सुनिता पवार तसेच शेवगावचे पोलीस अंमलदार ईश्वर बेरड व राजेंद्र बडे यांच्या पथकाने केली.पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
