सराफ व्यावसायिकांसोबत सुरक्षेच्या दृष्टीने कोतवाली पोलिसांची बैठक;सराफ बाजारात २४ तास सशस्त्र पोलिसाची नेमणूक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव
अहमदनगर (दि.४ ऑक्टोबर):-सराफा बाजारात तीन दिवसापूर्वी झालेल्या चोरीच्या घटनेनंतर पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी सराफ व्यावसायिकांसोबत बैठक घेतली.
या बैठकीत सराफ व्यवसायिकांना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काय काळजी घ्यायला पाहिजे,याचे मार्गदर्शन करण्यात आले. त्यासोबतच सराफा बाजाराच्या सुरक्षेसाठी लवकरच सीसीटीव्ही यंत्रणा त्यासोबतच खाजगी सुरक्षारक्षक व पोलिसांची सुरक्षा कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे यादव यांनी सांगितले.सराफा व्यावसायिकांची पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी काही दिवसांपूर्वी बैठक घेऊन सर्वांच्या मदतीने सराफा बाजारात खाजगी सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली होती.
सर्व सराफ व्यावसायिक,कोतवाली पोलीस आणि सिक्युरिटी गार्ड असा एक व्हाट्सअप ग्रुप तयार करून त्यावर रात्रगस्त करणाऱ्या सेक्युरिटी गार्ड यांचा पाठपुरावा घेतला जात होता.मात्र,मध्यंतरी खाजगी सुरक्षारक्षकांना त्यांचे पैसे न मिळाल्यामुळे काम थांबले होते.त्यानंतर कोतवाली पोलिसांनी पुढाकार घेऊ पुन्हा सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली होती.त्यासोबतच सराफा बाजारातील सर्व रस्त्यांवर रात्री सुरक्षा रक्षक बॅरिगेटिंग लावतील व सकाळी काढतील.तसेच कोणतीही अनुचित घटना घडू नये व घडल्यास त्याचा तात्काळ उलगडा व्हावा,यासाठी सराफा बाजारात चांगल्या प्रकारचे सीसीटीव्ही कॅमेरे लवकरच बसविण्याचा निर्णय सराफा व्यावसायिकांनी बैठकीत एकमताने घेतला आहे.
सराफ व्यावसायिकांना केलेल्या सूचना
पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सराफ व्यावसायिकांना काही सूचना केल्या.त्यामध्ये दुकानाचे शटर आडवे रोलिंग शटर बसवावे किंवा उभ्या शटरला २ ठिकाणी सेंट्रल लॉक करावे. तसेच, शटर, दरवाजा आणि खिडक्यांना सायरनची यंत्रणा लावावी, सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत आणि त्याचा डीव्हीआर हा कोणालाही दिसणार नाही, अशा सुरक्षित ठिकाणी ठेवावा, दुकानात पुर्ण वेळ सुरक्षारक्षक नेमावा, सराफा बाजारात कोणीही संशयित व्यक्ती आढळल्यास त्याची माहिती कोतवाली पोलिसांना द्यावी.
बाजारात २४ तास सशस्त्र पोलिसाची नेमणूक
सराफा बाजारात झालेल्या चोरीनंतर सशस्त्र पोलिसाची नेमणूक बाजारात करण्यात यावी अशी मागणी सराफ व्यावसायिक यांनी केली होती.सराफ व्यावसायिकांसोबत झालेल्या बैठकीत पोलीस निरीक्षक यादव यांनी दिवसा व रात्री सशस्त्र पोलीस कर्मचारी सराफा बाजारात २ दिवसांपासून तैनात केल्याचे यावेळी सांगितले.यावेळी जिल्हाअध्यक्ष संतोष वर्मा, नगर शहर सराफ संघटनेचे अध्यक्ष प्रकाश लोळगे, सुभाष मुथा सुभाष कायगावकर, राजेश मिरांडे, प्रकाश हिंगणगावकर, आनंद मुथ्था, शिवनारायण वर्मा, रमेशशेठ टाकळकर, विजय कुलथे, प्रकाश देवळालीकर व इतर 60 ते 70 सराफ व्यावसायिक आणि पोलीस उपनिरीक्षक शितल मुगडे, वैशाली पठारे,सचिन गायकवाड,वंदना काळे आणि गोपनीय पोलीस अंमलदार सुभाष गर्गे, देवेंद्र पांढरकर, योगेश खामकर आदी उपस्थित होते.