नगर (प्रतिनिधी):-नगरमधील प्रसिद्ध कान,नाक व घसा तज्ज्ञ डॉ.गजानन काशिद हे मागील अनेक वर्षापासून अनेक रुग्णांवर यशस्वीरीत्या उपचार करत आहेत.कान, नाक व घसा तज्ज्ञ म्हणून त्यांचा सर्वत्र नावलौकिक आहे.अतिशय अनुभवी रायनोप्लाटिक सर्जन म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. नुकतीच नगरचे पहिले कॉक्लियार (Cochlear) इम्प्लांट सर्जन म्हणून डॉ. गजानन काशीद यांनी पहिली कॉक्लियार इम्प्लांट शस्रक्रिया यशस्वी केली.
दरवर्षी 3 मार्च रोजी जागतिक श्रवण दिवस साजरा केला जातो. त्यानिमित्ताने डॉ.काशिद यांनी नगरकरांना कान,नाक व घसा यासंबंधी अत्याधुनिक उपचारांची माहिती दिली.यापूर्वी नगरकरांना नवजात बालकांच्या कानाची तपासणी करायची असेल,तसेच कॉक्लियार (Cochlear) इम्प्लांट शस्रक्रिया करायची असेल तर पुणे,मुंबई अशा मोठ्या शहरांमध्ये जाण्याशिवाय पर्याय नव्हता. आता मात्र आपल्या नगरमध्ये मागील जवळपास एक वर्षापासून एकूण 3 कॉक्लियार (Cochlear ) इम्प्लांट शस्रक्रिया यशस्वीरित्या झाल्या.ही मुले सामान्य मुलांप्रमाणे ऐकायला व बोलायला लागली आहेत. आज गजानन कान,नाक व घसा हॉस्पिटलमध्ये एक ते तीन वर्षांच्या बालकांवर मोफत कॉक्लियार (Cochlear) इम्प्लांट शस्रक्रिया झाल्या.
या सर्व शस्रक्रिया यशस्वी होण्यासाठी डॉ.गजानन काशिद यांच्यासह ऑडिओलॉजिस्ट डॉ.प्रशांत निर्मळ,डॉ.विठ्ठल उंडे यांनी परिश्रम घेतले.तसेच “आर बी एस के” प्रोग्राम टीमने ३ वर्षाखालील श्रवणबाधित बालकांसाठी मोफत कॉक्लियार (Cochlear) इम्प्लांट देऊन मोलाचे सहकार्य केले.यापुढेही श्रवण बाधित रुग्णांच्या निदान व उपचारासाठी अत्याधुनिक उपचार पद्धतींचा अवलंब केला जाईल,असे डॉ.काशिद यांनी सांगितले. त्याच प्रमाणे लहान मुलांचे कान कोरणे,कानात काही वस्तू घालणे, कानावर मारणे, सतत प्रचंड आवाज कानावर पडणे यामुळे श्रवण दोष निर्माण होऊ शकतो. घरी अथवा शाळेत मुलांना नीट ऐकू येत नाही, कानातून स्राव येतो आहे किंवा कान दुखत आहे असे लक्षात येताच पालक व शिक्षकांनी गांभीर्याने दखल घेऊन निदान व उपचार सुरू करावे, अशी माहिती डॉ. काशिद यांनी दिली. प्रत्येकी दोन पैकी एक तरुण व्यक्ती अतिशय असुरक्षित ऑडिओ डिव्हाईस द्वारे आवाज ऐकत आहे. ज्यामुळे श्रवण समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. श्रवण समस्या उद्भवू नये म्हणून विशेषतः युवावर्गाने आवाजाची मर्यादा पाळणे गरजेचे आहे,असा सल्ला डॉ. काशिद यांनी दिला.
या कारणांनी कमी ऐकू येते…
याशिवाय अचानक श्रवण क्षमता कमी होण्याचे प्रकार घडत आहेत. कमी ऐकू येणे, घड्याळाचा गजर झाल्याप्रमाणे आवाज येणे अशी काही लक्षणे रुग्णांना जाणवतात. त्यामागील कारणे योग्य निदान करून समजतात. त्यावर योग्य उपचार करता येतात, हे लक्षात घेऊन रुग्णांनी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन डॉ. काशिद यांनी केले आहे. सर्व रुग्णांना व्यवस्थित ऐकू येणे, बोलता येणे याकरिता सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा डॉ. गजानन काशिद यांचा मानस आहे.