सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नगर येथील उपकेंद्राचे उद्घाटन पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न
नगर (दि.३ प्रतिनिधी):-नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीमध्ये कौशल्य शिक्षणाला दिलेले प्राधान्य विचारात घेवून औद्योगिक क्षेत्राला आवश्यक असलेले मनुष्यबळ निर्माण करण्याचे काम विद्यापीठाच्या उपकेंद्रातून व्हावे अशी अपेक्षा महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नगर येथील उपकेंद्राचे उद्घाटन पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना.चंद्रकांत पाटील दुरदृष्य प्रणालीव्दारे या कार्यक्रमात सहभागी झाले होते.खासदार डॉ.सुजय विखे पाटील, जिल्हाधिकारी सिध्दराम सालिमठ, जिल्हा बॅकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डीले, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेंद्र विखे पाटील, कुलगुरु डॉ.सुरेश गोसावी, प्र.कुलगुरु डॉ.पराग काळकर यांच्यासह व्यवस्थापन परिषदेचे सर्व सदस्य याप्रसंगी उपस्थित होते.
आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील म्हणाले की,नगर येथे उपकेंद्र व्हावे यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांना अनेक वर्षांनंतर यश आले. या केंद्रासाठी पुढाकार घेणा-या सर्वांचेच अभिनंदन करुन, उपकेंद्र आता नगर येथे सुरु झाल्याने अधिकची जबाबदारी वाढली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने दिलेल्या नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्याचे मोठे आव्हान आपल्या सर्वांपुढे आहे. त्यासाठी आता विद्यापीठां बरोबरच महाविद्यालयांनीही पुढाकार घेण्याचे त्यांनी आवाहन केले.
आज शिक्षणाच्या परिभाषा सर्व बदलल्या आहेत. एकाच वेळी अनेक विद्या शाखांचे ज्ञान संपादन करण्याची प्रक्रीया गतीने पुढे जात आहे. यामध्ये पुणे विद्यापीठालाही मागे राहुन चालणार नाही. कारण केवळ बी.ए, बी.कॉम सारख्या तत्सम पदव्या घेवून विद्यार्थी आता स्पर्धेत टिकू शकणार नाही. यासाठी या पदवी शिक्षणा बरोबरच विद्यार्थ्यांना कौशल्य आणि तांत्रिक शिक्षणही कसे घेता येईल याचाही विचार व्हावा असे सुचीत करुन, मंत्री विखे पाटील म्हणाले की, नगर येथे सुरु झालेले उपकेंद्र हे कौशल्य शिक्षणाचे एक महत्वपूर्ण केंद्र ठरावे यासाठी कौशल्य विकासाचे सर्व कोर्स येथे तातडीने सुरु करुन, विद्यार्थ्यांना संधी देण्याची व्यवस्था निर्माण करावी.विद्यापीठाने आता आपली व्याप्ती वाढविणे गरजेचे आहे. कारण यापुर्वी विद्यापीठं एका चाकोरीमध्ये अडकली गेली. ए.आय.सी.टी, यु.जी.सी यांसारख्या कमिट्यांच्या मार्गदर्शक सुचनांमुळे आजपर्यंत संस्था कार्यरत राहील्या. परंतू आता या कमिट्यांचेच योगदान काय? असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे असे स्पष्ट करुन, याबाबत आता केव्हा तरी प्रधानमंत्र्यांशी आपण बोलणार असून, जिल्ह्यांमध्ये असलेल्या शैक्षणिक संस्थाची संख्या लक्षात घेवून प्रत्येक जिल्ह्यात आता स्वतंत्र विद्यापीठ निर्माण करण्याची मागणीही त्यांनी आपल्या भाषणात केली.
शिक्षण व्यवस्थेमध्ये कोचिंग क्लासचा वाढलेला हस्तक्षेप हे व्यवस्थेच अपयश आहे. या कोचिंग क्लासवर आपण कुठलेही नियंत्रण आणू शकलो नाही. महाविद्यालयात येणारा विद्यार्थी या कोचिंग क्लासकडे का वळाला? याचे आत्मपरिक्षण करण्याची गरज ना.विखे पाटील यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केली.खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी उपकेंद्राच्या इमारतीची निर्मिती ही स्व.दादा पाटील शेळके यांची स्वप्नपुर्ती असून, २५ वर्षे न सुटलेला प्रश्न हा मागील दोन वर्षात मार्गी लागला. या उपकेंद्राच्या इमारतीमुळे गावाचे अन्य प्रश्नही सोडविण्याची ग्वाही त्यांनी दिली. याप्रसंगी कुलगुरु डॉ.सुरेश गोसावी, डॉ.राजेंद्र विखे पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालक सिनेट सदस्य सचिन गोर्डे यांनी केले.