स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये जागतिक पर्यटन दिनानिमित्त भव्य छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन
अहमदनगर (प्रतिनिधी):-जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये एक भव्य छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.या प्रदर्शनाचे उद्घाटन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.वीणा मुंगी यांच्या हस्ते करण्यात आले.प्रसिद्ध छायाचित्रकार श्री.योगेश कर्डिले आणि सौ.रागिनी कर्डिले यांच्या सहकार्याने आयोजित या प्रदर्शनात देशभरातील ऐतिहासिक,धार्मिक व नैसर्गिक स्थळांची विविध छायाचित्रे सादर करण्यात आली आहेत.
कर्डिले दांपत्य, ज्यांचे वास्तव्य गोव्यात आहे,त्यांनी आपल्या कॅमेऱ्यातून टिपलेल्या हजारो छायाचित्रांमधून भारताचे संपन्न पर्यटन वैभव आणि संस्कृतीचे दर्शन घडवण्याचा प्रयत्न केला आहे.प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक व नैसर्गिक स्थळांची छायाचित्रे पाहून आपल्या ज्ञानाची कक्षा रुंदावली.शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना सखोल उत्तरं देऊन त्यांना पर्यटनाचे महत्त्व समजावून सांगितले.शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.मुंगी यांनी पर्यटन दिनाच्या महत्त्वावर प्रकाश टाकताना पर्यटनाचे आरोग्य,मानसिक शांतता आणि स्थानिक अर्थव्यवस्थेत योगदान यावर भर दिला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यास्मिन सय्यद यांनी केले,तर आभार प्रदर्शन शाळेचे ऍडमिनिस्ट्रेटर राजू पांढरे यांनी मानले.शाळेच्या सर्व शिक्षकांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले आणि विद्यार्थ्यांना पर्यटनाच्या माध्यमातून जीवनातील नव्या वाटांचा शोध घेण्याची प्रेरणा दिली.