Maharashtra247

महानगरपलिका आयुक्तांना स्वच्छता करताना पाहून अखेर नागरिकही स्वच्छता करायला सरसावले

 

अहमदनगर (दि.२६ प्रतिनिधी):-नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागृती व्हावी,शहर स्वच्छतेत नागरिकांचा सहभाग वाढावा व आपले शहर स्वच्छ,सुंदर रहावे,या उद्देशाने सुरू असलेल्या स्वच्छता मोहिमेत नागरिकांचा सहभाग वाढत आहे.स्वच्छता ही सेवा अभियानाच्या माध्यमातून गुरुवारी सकाळी आनंदधाम परिसरात शालेय विद्यार्थ्यांच्या सहभागातून स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.

यात महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे यांना स्वतः स्वच्छता,साफसफाई करताना पाहून नागरिकांनीही उत्स्फूर्तपणे साफसफाईच्या कामात सहभाग नोंदवला.अभियानाच्या नवव्या दिवशी आनंदधाम परिसरात महानगरपालिका कर्मचारी,जिजामाता शाळेचे विद्यार्थी व सीएसआरडीचे विद्यार्थी, नागरिकांच्या सहभागातून स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.यात मार्केटयार्ड ते आनंदधामपर्यंत लावण्यात आलेले रस्त्यावरील डिव्हायडर जेसीबीद्वारे हटवून त्याखालील माती,गवत साफ करण्यात आले.

जेटिंग मशीन द्वारे स्वतः आयुक्तांनी पाणी मारून माती साफ केली. रस्त्यालगत साचलेला कचरा,माती,प्लास्टिक कचरा उचलण्यात आला.जेटिंग मशिनद्वारे डिव्हायडर व रस्त्यांची स्वच्छता करण्यात आली.आनंदधाम चौकात स्वच्छतेबाबत पथनाट्यद्वारे जनजागृती करण्यात आली. विद्यार्थी,स्वयंसेवकांनी आपापल्या परिसरात स्वच्छता राखण्यासाठी नागरिकांना आवाहन केले.शुक्रवारी २७ सप्टेंबर रोजी सावेडी उपनगर परिसरात गंगा उद्यान व लगतच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे.यात समर्थ विद्यालय,आनंद विद्यालयाचे विद्यार्थी, महिला बचत गट व महानगरपालिकेच्या उद्यान व प्रसिद्धी विभागाचे कर्मचारी सहभागी होणार आहेत. नागरिकांनीही यात सहभागी व्हावे,असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page