अहिल्यानगर (प्रतिनिधी):- महावितरणचे अधिकारी व कर्मचारी हे रंगोली चौक केडगाव येथे लाईटचा फॉल्ट शोधत असताना सागर बापूसाहेब मस्के,शहबाज निसार सय्यद (दोघे रा.केडगाव अहिल्यानगर) यांनी राहुल सिताराम शीलवंत (सहाय्यक अभियंता महावितरण) यांना व सोबत असलेल्या साक्षीदार यांना तुम्ही फोन का उचलत नाही लाईट गेली आहे? तुम्ही तुमचे काम कसे करता ते आम्ही पाहतो असे म्हणून शिवीगाळ करून धक्काबुक्की करून खिशातून दोन हजार रुपये काढून घेऊन सरकारी कामात अडथळा आणलेला आहे.

महावितरणचे अभियंता शीलवंत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.सदरील गुन्ह्याचा तपास करत असताना कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की गुन्ह्यातील फरार आरोपी हे स्वतःचे अस्तित्व लपवून बाहेरगावी एसटी बस ने पळून जाणार आहे. अशी माहिती प्राप्त झाल्यानंतर गुन्हे शोध पथकाने कांदा मार्केट रोड केडगाव येथे सापळा रचून दोघा आरोपींना पकडले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सपकाळे हे करीत आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती,कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे,सपोनी.सपकाळे,पोलीस अंमलदार पितळे,विशाल दळवी, रोहिणी दरंदले,दीपक रोहकले, तानाजी पवार,दत्तात्रय कोतकर, शिरीष तरटे,सुरज कदम,राम हंडाळ,सचिन लोळगे,महेश पवार,प्रतिभा नागरे यांनी केली आहे.