चंदनापुरी मधील विद्यार्थ्यांची क्षेत्रभेट सहल थेट शेतात..इनोव्हेटर्स पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचा शेती,व्यवसाय ,ग्रामपंचायत प्रशासनाचा अभ्यास
संगमनेर प्रतिनिधी (नितीनचंद्र भालेराव):-रोज शाळेत जाऊन तोच तोच अभ्यास करुन विद्यार्थी कंटाळतात.विद्यार्थ्यांनाही काहीतरी नवीन हवंच असतं. जर विद्यार्थ्यांना निसर्गाचं शिक्षण दिलं तर विद्यार्थी देखील रमतात. शाळेतील शिक्षण विद्यार्थ्यांना जगाशी लढण्याची ताकद देतं. त्यामुळेच इनोव्हेटर्स पब्लिक स्कूल त्यांची एक सहल म्हणून शेतात किंवा बाहेर फिरायला घेऊन जात असते.संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी येथील इनोव्हेटर्स पब्लिक स्कूलच्या इ. 6 वी व 9 वी मधील विद्यार्थ्यांची क्षेत्रभेट सहल धांदरफळ खुर्द या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती.शेतकऱ्याच्या शेतात जाऊन प्रत्यक्षात लागवड करणे अनुभवण्यासाठी शालेय गणवेशातील विद्यार्थी थेट कोबीच्या शेतात उतरले.लिंबाची बाग,नारळाची उंच उंच झाडे विध्यार्थ्यांनी पुस्तकातून अभ्यासली होतीच,मात्र प्रात्यक्षिकातून अनुभूतीचा हा मोठा धडा मिळाल्यानं त्यांच्या चेहऱ्यावर एक आत्मिक समाधान होतं.ग्रामपंचायत, तलाठी कार्यालयात जाऊन प्रशासकीय कामकाजाची प्रत्यक्ष माहिती घेतली.मूर्तिकारांच्या भेटीतून शिल्पातील सजीवता, कल्पकतेचा विद्यार्थ्यांनी नवीनच अनुभव घेतला.
क्षेत्रभेटी सहलीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी गावातील ग्रामपंचायत या ठिकाणी जाऊन गावातील सर्व पायाभूत सुविधा,शिक्षण,लोकसंख्या रचना,जमिनीचे विभागणी,नोकरीच्या संधी,सेंद्रिय शेती व व्यवसाय इत्यादी बद्दल माहिती घेतली.या क्षेत्रभेट सहलीच्या दरम्यान ग्रामपंचायत मध्ये सरपंच व सदस्य,तलाठी,विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन इत्यादी मान्यवर उपस्थितीत होते.व त्यांनी सर्व ग्रामपंचायत कामकाजाची माहिती विद्यार्थ्यांना देऊन मार्गदर्शन केले.
त्या नंतर गावातील मूर्तिकला या पारंपरिक व्यावसायात पारंगत असणारे वाकचौरे यांच्या कारखान्याला भेट दिली.गणपती मूर्ती,बैल,माठ,रांजण,चूल,देवीच्या मूर्ती, पणती,किल्ले,कुंड्या,तुळशी वृंदावन इत्यादी माती पासून बनविलेल्या वस्तूं बद्दल माहिती घेतली.शिल्पकले विषयी माहिती शिल्पकार वाकचौरे यांनी दिली.त्यांनी बनविलेल्या शिल्पांची सजीवता,कल्पकता, सुंदरता डोळ्यांचे पारणे फेडणारी होती.शिल्पकार वाकचौरे यांनी बनविलेल्या मातीच्या वस्तू मूर्ती शिल्पे पाहण्यात दंग झाले होते. या क्षेत्रभेटी सहलीच्या निमित्ताने भारतीय संस्कृती व व्यवसायाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजले.तसेच विद्यार्थ्यां मध्ये चैतन्याचे, उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
मुलांना अनेकदा अनेक गोष्टी पुस्तकात शिकून कळत नाही. ज्या गोष्टी पुस्तकातून शिकता येतात त्या शिकवाव्यात मात्र ज्या गोष्टी प्रात्यक्षिक करुनच शिकवायला हव्या त्या गोष्टींसाठी विद्यार्थ्यांना बंद खोल्यांच्या शाळेच्या बाहेर काढणं गरजेचं असतं.या बंद खोल्यांच्या बाहेरच्या शाळेत मुलांना वेगवेगळे धडे दिले पाहिजेत. शेतकरी,बळीराजा कसा राबतो, हे मुलांना कळलं पाहिजे आणि आपल्या घरात भाजीपाला कसा येतो, हे देखील मुलांना कळलं पाहिजे, यासाठी मुलांना थेट खताळ यांच्या शेतात गेले.त्या नंतर शेती विषय माहिती प्रगतशील शेतकरी खताळ यांच्या शेतीला भेट देऊन शेती मध्ये असणारे आव्हाने व फायदे,शेती साठी भांडवल,मजूर पुरवठा,पाणी पुरवठा,रासायनिक खते व औषधे,व सेंद्रिय शेती या व इतर अनेक विषयांची माहिती विद्यार्थ्यांनी समजून घेतली.