रेशनकार्ड हा अनाथांचा तर प्रमुख अधिकार आहे.. तालुका पुरवठा अधिकारी शिवराज पवार
अहिल्यानगर (दि.15 जुलै प्रतिनिधी):-संस्थात्मक तसेच संस्था बाह्य अनाथ मुलांना त्यांची कागदपत्रे गोळा करताना फार समस्यांना सामोरे जावे लागते. यामध्ये त्यांचे आधार कार्ड बनवणे, पॅनकार्ड काढणे, जातीचे दाखले काढणे तसेच रेशनकार्ड काढणे हे देखील गंभीर होऊन बसते. कारण अशा मुलांच्या जन्माच्या नोंदी, जातीच्या नोंदी तसेच पत्त्याच्या नोंदी वेगवेगळ्या असतात. अनाथ मुलांना स्वावलंबी होण्यासाठी साधारणपणे 20 ते 25 वर्षाचा कालावधी लागतो.
अठरा वर्षानंतर ही मुले संस्थेच्या आधाराने पुढील शिक्षण घेत असतात परंतु त्यांच्याकडे रेशनकार्ड नसल्याने त्यांना अन्नधान्य वितरण सुरळीत करता येत नाही.सर्वसामान्य मुलांप्रमाणेच रेशन कार्ड हा अनाथ मुलांचा प्रमुख अधिकार आहे असे तालुका अन्नधान्य पुरवठा अधिकारी श्री शिवराज पाटील यांनी सांगितले.शिवराज पाटील यांच्या हस्ते आज स्नेहालय संस्थेतील अनाथ मुलांना रेशन कार्ड वितरण करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते. स्नेहालय संस्थेतून 18 वर्षे पूर्ण होऊन बाहेर पडलेल्या मुलांच्या जीवनातील प्रश्न सोडवण्यासाठी स्नेहालय संस्थेचा स्नेहबंध प्रकल्प कार्यरत आहे. स्नेहबंध प्रकल्पाचे संचालक मिलिंद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प काम करतो. प्रकल्पाच्या वतीने अनाथ मुलांना विविध शासकीय योजनांची माहिती देणे त्यांना जीवन जगण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे उपलब्ध करून देणे. आरोग्याच्या संदर्भात काही प्रश्न उपस्थित झाल्यास त्यांना त्वरित मदत करणे ही कामे प्रकल्पाच्या वतीने केले जातात. संस्थेतून बाहेर गेलेल्या ज्या मुलांकडे अनाथ प्रमाणपत्र उपलब्ध आहेत. अशा अनाथ मुलांचे रेशन कार्ड काढण्याबाबतचे प्रस्ताव तालुका पुरवठा अधिकारी श्री शिवराज अंबादास पवार यांच्याकडे जमा केले होते. साहेबांनी अशा अनाथ मुलांचे काम खूप तत्परतेने केले.आज स्नेहालय संस्थेतील बालकांना त्यांच्या हस्ते रेशन कार्डचे वितरण करण्यात आले. अनाथ मुलांना रेशन कार्ड देण्याबाबतचा स्वतंत्र जी.आर.असल्याचे सांगत ज्या मुलांकडे आधार कार्ड,अनाथ प्रमाणपत्र व तो ज्या ठिकाणी रहिवासी आहे त्या ठिकाणचे सरपंचाचे पत्र उपलब्ध झाल्यास अशा मुलांना त्वरित रेशन कार्ड उपलब्ध करून देता येते.या संधीचा फायदा अनाथ मुलांनी घ्यावा असे त्यांनी सांगितले .
व्यासपीठावरून उपस्थितांना मार्गदर्शन करताना विधीतज्ञ श्याम असावा यांनी सांगितले की, आज समाजामध्ये स्नेहालय संस्थेप्रमाणेच कर्तव्यदक्ष शासकीय अधिकाऱ्यांची गरज आहे.श्री शिवराज पवार यांच्यासारख्या शासकीय अधिकाऱ्यामुळे अशा अनाथ मुलांचे विविध प्रश्न सुकर करण्यास मोठी मदत होते. अहमदनगर मधील विविध शासकीय सेवेतील अधिकारी नेहमीच स्नेहालयास मदत करण्यासाठी पुढे असतात त्यामुळे संस्थेला अनेक समाज उपयोगी कामे करण्यासाठी पाठबळ मिळते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाधान धालगुडे यांनी केले तर आभार प्रदर्शन संस्थेचे विश्वस्त संजय बंदिष्टी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संगीता सानप,माऊली वाघ, रेखा पाथरकर यांनी विशेष परिश्रम घेतले.