Social work…शासकीय रुग्णालयांतील शुल्क आकारणी तात्काळ रद्द करा..अन्यथा तीव्र आंदोलन.. रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रचा इशारा
छत्रपती संभाजीनगर (दि.१० फेब्रुवारी):-राज्य शासनाने शासकीय रुग्णालयांमध्ये पुन्हा शुल्क आकारणी सुरू करण्याचा घेतलेला निर्णय हा गोरगरीब, शेतकरी व कष्टकरी जनतेच्या आरोग्यावर घाला घालणारा असून तो तात्काळ रद्द करून ‘पूर्ण मोफत उपचार’ सेवा पूर्ववत करावी, अशी ठाम मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रच्या वतीने करण्यात आली आहे.या मागणीचे निवेदन आज जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.मागणी मान्य न झाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.राज्य शासनाने जिल्हा रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये दिले जाणारे मोफत उपचार बंद करून पुन्हा केसपेपर, तपासण्या व शस्त्रक्रियांसाठी शुल्क आकारणी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री बसणार असून जनतेत तीव्र असंतोष पसरला आहे.
या संदर्भात पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिनेश गवळे यांनी प्रशासनाचे लक्ष वेधत सांगितले की, शासकीय रुग्णालये हाच गोरगरीब जनतेचा एकमेव आधार आहे. अडीच वर्षांपूर्वी सुरू झालेली ‘मोफत उपचार योजना’ ही गरिबांसाठी वरदान ठरली होती. मात्र आता पुन्हा विविध उपचारांसाठी पैसे मोजावे लागणार असल्याने अनेक रुग्ण उपचारांपासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे. हा निर्णय आरोग्य हक्कावर गदा आणणारा असून तो पूर्णतः जनहितविरोधी आहे.
निवेदनातील प्रमुख मुद्दे :
आरोग्य हक्काचे उल्लंघन : संविधानाने दिलेल्या आरोग्याच्या अधिकारावर शासनाच्या निर्णयामुळे आघात होत आहे.ग्रामीण भागावर गंभीर परिणाम : ग्रामीण भागातील रुग्ण पूर्णतः प्राथमिक आरोग्य केंद्रांवर अवलंबून आहेत. शुल्क आकारणीमुळे उपचार घेणे अशक्य होईल.तात्काळ निर्णय मागे घ्या : केसपेपरपासून शस्त्रक्रियेपर्यंत सर्व सेवा पुन्हा पूर्णतः मोफत कराव्यात.औषधांचा पुरवठा वाढवा : रुग्णालयांतील औषधांचा तुटवडा तात्काळ भरून काढून आरोग्य यंत्रणा सक्षम करावी.
🔹लोकशाही मार्गाने आंदोलनाचा इशारा
“प्रशासनाने या निवेदनाची गंभीर दखल घेऊन आमच्या मागण्या राज्य शासनापर्यंत पोहोचवाव्यात. जर हा अन्यायकारक निर्णय मागे घेतला गेला नाही, तर जनतेच्या हितासाठी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रच्या वतीने देण्यात आला आहे.
🔹 यांची होती प्रमुख उपस्थिती :
मराठवाडा उपाध्यक्ष सुनील खरात,जिल्हा उपाध्यक्ष अरशाद लखपती, शहर उपाध्यक्ष अनिस गंगापूरकर,फैजान भाऊ,उजैर भाई,हनु नाना,गणेश गौरये, शाहीद लखपती, कलीम खान यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
