शिकता-शिकता व्यापाराचे धडे..! निमगाव शाळेच्या बाल आनंद बाजारात २५ हजारांची कमाई..
श्रीरामपूर (वार्ताहर) :-तालुक्यातील निमगाव खैरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, निमगाव यांच्या शताब्दी महोत्सव वर्षानिमित्त ‘आनंददायी शनिवार’ उपक्रमाअंतर्गत आयोजित बाल आनंद बाजार मेळावा उत्साहात संपन्न झाला. या आनंद बाजारातून विद्यार्थ्यांनी २५ हजार रुपयांची उलाढाल करत व्यवहारिक शिक्षणाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.बाल आनंद बाजाराचे उद्घाटन केंद्रप्रमुख बाबासाहेब पिलगर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मुख्याध्यापक संतोष वाघमोडे यांनी बाल आनंद बाजार मेळाव्याचा उद्देश व महत्त्व विशद केले. पाठ्यपुस्तकी शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून व्यवहारिक ज्ञान मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष विलास शेजुळ यांनी आनंद बाजार उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष व्यवहार, खरेदी-विक्री, नफा-तोटा यांचे ज्ञान मिळते, असे प्रतिपादन केले. यावेळी केंद्रप्रमुख बाबासाहेब पिलगर व सरपंच दत्तात्रय झुराळे यांनी आपल्या मनोगतातून या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच दत्तात्रय झुराळे, उपसरपंच विजयसिंग परदेशी, मार्केट कमिटीचे माजी उपसभापती नितीन भागडे, ग्रामपंचायत सदस्य सुरेश कालंगडे, भागचंद उंदरे, अमोल कालंगडे, ज्येष्ठ नागरिक वेणूनाथ कालंगडे, बाळासाहेब दुशिंग, रावसाहेब शेजुळ, कृष्णा पठारे, गोस्वामी बाबा, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गणेश तरस, उपाध्यक्षा सोनाली साबळे, संतोष भागडे, महेंद्र साबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमात शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेत म्हैसूर भोंडा, दाबेली, इडली, पोहे, पाणीपुरी, सरबत, शाबुदाणा वडा, समोसा, पापड, ओली भेळ, न्यूडल्स, पालकपुरी, ढोकळा, सोयाबीन चिली, मॅगी तसेच विविध प्रकारची सरबते यांचे आकर्षक स्टॉल लावले होते. याशिवाय मिरची, मेथी, पालक, कांदे, वांगी, शेवग्याच्या शेंगा, गवती चहा, शेपू, लिंबू, मुळा, हरभरा, वाल शेंगा, अळूची पाने, करडई भाजी, मक्याचे कणीस आदी भाजीपाल्यांचेही स्टॉल लावण्यात आले होते.ग्राहकांची मोठी गर्दी असून विद्यार्थी आपल्या खुमासदार शैलीत ग्राहकांना आकर्षित करत विक्री करताना दिसून आले. या आनंद बाजारात आवेज अफसर शेख या विद्यार्थ्याच्या मिरचीच्या स्टॉलने सर्वाधिक १,८०० रुपये, तर पियूष योगेश जाधव याच्या औषधी सरबत स्टॉलने १,२०० रुपयांची कमाई केली.या उपक्रमातून विद्यार्थ्यांना वस्तू विक्रीचे कौशल्य, ग्राहकांना आकर्षित करण्याचे तंत्र व व्यवहारिक ज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. यावेळी अहिल्यानगर जिल्हास्तरावरील उत्कृष्ट व बचतगटाचा आदर्श सीआरपी पुरस्कार मिळाल्याबद्दल संगिता काळे यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक संतोष वाघमोडे, शिक्षिका प्रतिभा तोरणे, मीना निकम व सुधा गमे यांनी विशेष परिश्रम घेतले. आनंद बाजारात खरेदीसाठी ग्रामस्थ, माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
