CRIME..पुरावा नष्ट करण्यासाठी तरुणाचा केला असा निर्घृण खून..गोणीत बांधलेला मृतदेह नदीत आढळला
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-श्रीगोंदा तालुक्यातील निमगाव खलु शहराजवळ भीमा नदीच्या पात्रात एक अत्यंत धक्कादायक व अंगावर काटा आणणारी घटना उघडकीस आली असून, एका अज्ञात तरुणाचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आल्याने संपूर्ण तालुका हादरून गेला आहे. तरुणाचा अत्यंत क्रूरपणे खून करून पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह नदीत फेकण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.ही घटना श्रीगोंदा पोलीस स्टेशन हद्दीतील असून, शनिवारी भीमा नदीवरील रेल्वे पुलाजवळ काही स्थानिक नागरिकांच्या लक्षात पाण्यात तरंगणारी गोणीसारखी संशयास्पद वस्तू आली. नागरिकांनी तत्काळ याची माहिती श्रीगोंदा पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.संशयास्पद वस्तू बाहेर काढून तपासणी केली असता, साधारण ३५ वर्षीय तरुणाचा मृतदेह त्यामध्ये आढळून आला. मृतदेहाची अवस्था पाहून हा खून अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. मारेकऱ्यांनी मृतदेहाची ओळख लपवण्यासाठी व तो बाहेर येऊ नये म्हणून विशेष काळजी घेतल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
प्लास्टिक ताडपत्री, बारदान आणि साडीने घट्ट बांधले होते गाठोडे
मृतदेह प्लास्टिकच्या ताडपत्रीत व बारदानात गुंडाळून, त्यावर साडीच्या साहाय्याने घट्ट गाठ मारण्यात आल्याचे दिसून आले आहे. गाठोडे सुटू नये आणि मृतदेह पाण्यावर येऊ नये, यासाठी ही काळजी घेतली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. मृतदेहाची ही अवस्था पाहून अनुभवी पोलिस अधिकारीही स्तब्ध झाले.या निर्घृण कृत्यामुळे निमगाव खलु, श्रीगोंदा व आसपासच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये दहशतीचे सावट पसरले आहे. वर्दळीच्या वसाहतीजवळ अशा प्रकारे मृतदेह सापडल्याने सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
उजव्या हातावरील ‘त्रिशूळ-महादेव’ टॅटू ठरतोय तपासाचा धागा
सध्या या मयत तरुणाची ओळख पटलेली नसली, तरी पोलिसांच्या हाती तपासाचा एक महत्त्वाचा धागा लागला आहे. मृत तरुणाच्या उजव्या हातावर ‘त्रिशूळ’ आणि ‘महादेव’ हे चिन्ह गोंदलेले (टॅटू) आढळून आले आहेत. या टॅटूच्या आधारे आणि अंदाजे वय लक्षात घेऊन, पोलीस आता त्याची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत.मृत व्यक्ती कोण आहे? तो स्थानिक आहे की बाहेरगावचा? त्याचा खून कोणत्या कारणातून झाला? यामागे जुना वाद, आर्थिक व्यवहार, प्रेमप्रकरण किंवा गुन्हेगारी टोळीचा हात आहे का? अशा अनेक शक्यतांचा तपास सुरू आहे.
बेपत्ता व्यक्तींची यादी, CCTV फुटेज तपास सुरू
श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात येत आहेत. पोलिसांनी तालुक्यासह शेजारील भागातील बेपत्ता व्यक्तींची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. तसेच, रेल्वे पूल, नदीकाठ, रस्ते व दुकानांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.गुन्हेगारांनी मृतदेह बांधण्यासाठी वापरलेली साडी व ताडपत्री कुठून आणली, ती नवीन आहे की वापरलेली, याचाही शोध घेतला जात असून, यावरून मारेकऱ्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.दरम्यान, या प्रकरणाचा उलगडा लवकरच होईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला असून, मारेकऱ्यांना अटक करून कठोर कारवाई करण्यात येईल, असेही सांगण्यात आले आहे.
