‘त्या’ घाटात सापडलेल्या मृतदेहामागचं काळीज पिळवटून टाकणारं सत्य एलसीबीने आणले उघड..! खून करणारे वडील व भाऊ अखेर जेरबंद
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-अहिल्यानगर येथील डोंगरगण मधील खुनाची स्थानिक गुन्हे शाखेकडून अवघ्या काही दिवसांत उकल करण्यात आली असून खुन करणारे वडील व भाऊ यांना राहुरी येथून जेरबंद करण्यात आले आहे.बातमीची हकीगत अशी की,दि. 17/02/2026 रोजी 11/00 वा.चे पुर्वी वांबोरी ते डोंगरगण गावचे शिवारात डोंगरगण घाटात डांबरी रस्त्यापासुन वन विभागाच्या हद्दीत दरीत एक अनोळखी मयत पुरुषाचे प्रेत वय अंदाजे 35 ते 40 वर्षे यास कोणीतरी अज्ञात आरोपीने अज्ञात कारणा करीता जीवे ठार मारुन प्रेत गोणीमध्ये बांधुन दरीत टाकुन देवुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता.
सदर घटनेबाबत फिर्यादी पोकॉ/1636 ज्ञानेश्वर शेषराव तांदळे वय-38 वर्षे नेम.एम.आय.डी. सी.पोलीस स्टेशन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन गु.र.नं. 120/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103(1), 238 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेस सदर गुन्हा उघडकीस आणून आरोपीस तात्काळ ताब्यात घेण्याबाबत आदेश दिले होते.सदर आदेशानुसार आणि गुन्हे शाखेचे पोनि.श्री.किरणकुमार कबाडी यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली.अनोळखी मयताची ओळख पटविणे व आरोपी निष्पन्न करणे कामी स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि अनंत सालगुडे,पोलीस अंमलदार विष्णु भागवत,दिपक घाटकर,गणेश धोत्रे,फुरकान शेख,आकाश काळे,बाळासाहेब गुंजाळ,अमृत आढाव,प्रशांत राठोड,चालक महादेव भांड यांचे विशेष पथक तयार करण्यात आले.पथकाने अहिल्यानगर जिल्ह्यात मागील काही दिवसांत कोणी इसम मिसिंग आहे काय याबाबत माहिती घेतली असता टाकळीमियॉ ता.राहुरी येथील एक इसम मिसिंग असल्याची, मात्र नातेवाईकांनी मिसिंग तक्रार दाखल केलेली नसल्याची माहिती मिळाली.
सदर माहितीच्या आधारे पथकाने दि.19/02/2026 रोजी टाकळीमियॉ येथे जावून शिवाजी शंकर कवाणे वय-55 वर्षे,योगेश शिवाजी कवाणे वय-30 वर्षे दोन्ही रा. टाकळीमियॉ ता.राहुरी जि. अहिल्यानगर) यांना ताब्यात घेतले.सखोल व बारकाईने चौकशी केली असता योगेश शिवाजी कवाणे याने त्याचा मयत भाऊ किरण शिवाजी कवाणे हा नेहमी दारु पिवून आई-वडिलांना मारहाण करत असल्याच्या कारणावरून वडिलांच्या मदतीने खून केल्याची कबुली दिली आहे.खून केल्यानंतर प्रेताची विल्हेवाट लावण्यासाठी वापरलेली स्विफ्ट कार नंबर एम. एच. 46 एक्स. 7460 ही तपासकामी जप्त करण्यात आली आहे.ताब्यातील आरोपींना पुढील तपासासाठी एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून गुन्ह्याचा पुढील तपास एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन करीत आहे.
