RTE प्रवेश नाकारला तर आंदोलन..!भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन…आर्थिकदृष्ट्या दुर्बल बालकांच्या मोफत शिक्षणासाठी भारतीय बौद्ध महासभेचा पुढाकार
अहिल्यानगर (प्रतिनिधी) – भारतीय बौद्ध महासभा, शहर शाखा अहिल्यानगर यांच्या वतीने शिक्षण हक्क कायद्यान्वये (RTE) आर्थिकदृष्ट्या मागास, दुर्बल व वंचित घटकातील बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण मिळावे, यासाठी बुधवारी (दि. 26/02/2026) सकाळी 11.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर तसेच शिक्षण अधिकारी, जिल्हा परिषद कार्यालय येथे निवेदन देण्यात आले.निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, RTE अंतर्गत पात्र बालकांच्या प्रवेशासाठी काही शाळा ऑनलाईन पोर्टलवर अर्ज स्वीकारत नसल्याच्या तक्रारी पालकांकडून प्राप्त होत आहेत. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाचा मूलभूत अधिकार बाधित होत असल्याची गंभीर बाब महासभेने मांडली.
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, शिक्षण हक्क कायदा हा केवळ कागदोपत्री न राहता प्रत्यक्षात प्रभावीपणे राबविणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत अडथळे निर्माण करणाऱ्या शाळांवर तातडीने कारवाई करावी, तसेच पात्र विद्यार्थ्यांना त्वरित प्रवेश मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली.यावेळी जिल्हाधिकाऱ्यांकडे आणि शिक्षण अधिकाऱ्यांकडे सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. संबंधित अधिकाऱ्यांनी या विषयाची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली.भारतीय बौद्ध महासभेने इशारा दिला आहे की, RTE अंतर्गत बालकांना प्रवेश नाकारण्याचे प्रकार त्वरित थांबवले नाहीत, तर पुढील काळात तीव्र आंदोलन छेडले जाईल.आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकातील प्रत्येक बालकाला शिक्षणाचा अधिकार मिळालाच पाहिजे, हीच आमची भूमिका असल्याचे संघटनेने ठामपणे सांगितले. यावेळी निवेदन देता समयी संदीप वाघमारे,दीपक पाटोळे, संतोष जाधव,डहाणे आदी फुले शाहू आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते.
